भीमाशंकर विकास आराखड्याचा खर्च कुठे गेला?; सोयींपेक्षा गैरसोयीच अधिक : सुळे   

भीमाशंकर : श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखड्यासाठी करण्यात आलेला खर्च नेमका कुठे झाला, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. विकास आराखड्यावर खर्च होऊनही भीमाशंकर परिसरात सोयींपेक्षा गैरसोयी अधिक असल्याचे दिसून येत आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिणार असल्याचे सुळे यांनी सांगितले.भीमाशंकरचे दर्शन घेतल्यानंतर घोडेगाव येथे पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी देवदत्त निकम, जयसिंग काळे, सदानंद शेवाळे आदी उपस्थित होते.
 
भीमाशंकरकडे जाणार्‍या रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्याचे सांगत सुळे यांनी राज्यातील ग्रामीण रस्त्यांच्या स्थितीवरही टीका केली. महाराष्ट्राची ओळख खड्ड्यांचे राज्य अशी होऊ नये, यासाठी शासनाने मोठ्या प्रकल्पांबरोबरच ग्रामीण भागातील मूलभूत सुविधांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. हजारो कोटी रुपयांचे मोठे प्रकल्प करण्यापेक्षा ग्रामीण रस्त्यांची दुरुस्ती आणि नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याला प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले.
 
भीमाशंकर मंदिर चार महिने बंद असताना परिसराचा मोठा कायापालट होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, मागील परिस्थितीपेक्षा यावेळी अधिक खराब स्थिती दिसून आल्याचे सुळे म्हणाल्या. पुणे-नाशिक रेल्वेचा मार्ग बदलण्याच्या चर्चेबाबतही त्यांनी नाराजी व्यक्त केली. रेल्वे आणि वाहतूक समस्येबाबत खासदार डॉ. अमोल कोल्हे सातत्याने दिल्लीमध्ये पाठपुरावा करत असल्याचे त्यांनी सांगितले.
 
कांदा, दूध व साखरेच्या दरांबाबत सरकार असंवेदनशील असल्याची टीका करत शेतकर्‍यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची मागणी त्यांनी केली. शालेय पोषण आहारातील निकृष्ट धान्याची सखोल चौकशी व्हावी, तसेच आदिवासी विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याची वेळ येणे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी नमूद केले.दूध भेसळीवर कठोर कारवाई झाली पाहिजे. भेसळमुक्त महाराष्ट्रासाठी सरकारच्या पाठीशी राहू; मात्र कारवाईत कोणतेही ‘फिक्सिंग’ होता कामा नये, असे सुळे यांनी स्पष्ट केले.
 

Related Articles