‘मनवेध’ आणि ‘अविरत’ पुस्तकांचे राज्यपाल आर्लेकर यांच्या हस्ते प्रकाशन   

पणजी : आजच्या वेगवान डिजिटल युगात मोबाईल आणि सामाजिक माध्यमांच्या वाढत्या वापरामुळे नव्या पिढीमध्ये वाचनाची सवय कमी होत चालली असून, ही परिस्थिती बदलण्यासाठी व्यापक ‘वाचन चळवळ’ उभारण्याची नितांत गरज आहे, असे प्रतिपादन केरळ व तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी केले. 
 
श्याम गावकर लिखित ‘मनवेध’ आणि ‘अविरत’ या दोन पुस्तकांच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर  माहिती व प्रसिद्धी खात्याचे संचालक अभिर हेदे, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब, संगम भोंसुले, लेखक श्याम गावकर उपस्थित होते.
वाचन संस्कृती टिकवून ठेवणे आव्हान बनले असताना गावकर यांच्यासारखे लेखक सकस लेधन करत आहेत, हे महत्त्वाचे होय, असे अभिर हेदे यांनी सांगितले. गावकर यांचे लेखन सर्वस्पर्शी आहे, असे संगम भोंसुले यांनी सांगितले. 
 
लेखक श्याम गांवकर म्हणाले की,  बदलत्या सामाजिक जीवनातील या वास्तवाचे प्रतिबिंब आपल्या लेखनातून मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. या दोन्ही पुस्तकांमध्ये कोणताही उपदेश करण्याचा हेतू नसून समाजात घडणार्‍या विविध घटना, बदलते मानवी संबंध आणि जीवनातील अनुभव यांचा संवेदनशीलतेने वेध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. यावेळी, इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझाचे अध्यक्ष दशरथ परब यांचेही भाषण झाले. मंजरी मयुरेश वाटवे यांनी सूत्रसंचालन केले . ओंकार गोवेकर यांनी आभार मानले.
 

Related Articles