सेबीचे सीएएस की तकेशीचा कॅसल?   

धनंजय दीक्षित

dhananjay@kalyanicapital.com

बहुतेक जणांनी टीव्हीवरील हा कार्यक्रम नक्की बघितला असेल... एक अडथळ्यांची शर्यत पार करताना होणारी स्पर्धकांची त्रेधातिरपीट, धपाधप पडणे, चित्र-विचित्र ’राक्षसांकडून’ मार खाणे हे पाहताना हसून हसून मुरकुंडी वळायची.
 
सेबीने ऑगस्टपासून लागू केलेल्या सीएएस प्रणालीमध्ये ऑप्शन सौदेबाजांची अवस्था या स्पर्धकांसारखी झालेली दिसून येतेय, फक्त अजिबात हसू येत नाहीये... खरे खुरे पैसे मात्र जात आहेत.
 
गेल्याच आठवड्यात पार पडलेल्या एनएसई व बीएसईवरील वायदेबाजाराच्या सौदापूर्ती सत्रांमध्ये याची पुरेपूर प्रचिती आली. मंगळवारी दुपारी ३:१५ वाजता निफ्टी २४,२६०.१५ पातळीवर बंद झाला होता. नंतर ३:२० ते ३:२८ या सीएएस काळाच्या शेवटी तो एकदम उडी मारून २४,३३४.५५ अंकांवर बंद झाल्याचे दिसले. (म्हणजेच ७४.४० अंकांनी वर). 
 
या उलट गुरुवारी - बीएसईवरील मासिक सौदापूर्तीच्या वेळेस दुपारी ३:१५ वाजता निफ्टीचा बंद भाव २४,१३३.५० असा होता, तर सीएएस काळात त्यात घसरगुंडी होऊन २४,०९०.८५ पातळीवर आला. (सेन्सेक्समध्ये तर गुरुवारी याच काळात २४९ अंकांचा फरक खालच्या बाजूने पडला) निर्देशांकांच्या सध्याच्या पातळ्यांच्या मानाने हे फरकाचे आकडे किरकोळ वाटत असले तरी या कमी वेळात होणार्‍या फरकामुळे ऑप्शन प्रीमियममध्ये प्रचंड उलथापालथ होते आहे आणि ऑप्शन सौदेबाजांची पळता भुई थोडी होते आहे.
 
बरं, हा जो शेवटचा आकडा कळतो तो ३ वाजून २८ मिनिट ते ३ वाजून २९ मिनिट या काळात कधीही... निश्चित वेळ मुद्दाम ठरलेली नाही. बाजारातील सौदेबाजांची सर्वात नावडती गोष्ट म्हणजे अस्थिरता आणि सेबीच्या सीएएस प्रणालीमुळे तीच फोफावली आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
 
इतके असूनही सेबी काही आपला निर्णय बदलण्यास तयार नाही; पण असे चालू राहिल्यास भारतीय शेअरबाजारावरील वायदे व्यवहार कमी होणार असे वाटते.
१७ तारखेच्या लेखात आपण बघितले होते, की निफ्टीने बॉलिंगर बॅण्ड या आलेख शास्त्रातील एका महत्त्वाच्या दिशादर्शकांच्या नियमांनुसार वाटचाल आरंभिली होती. ती २८ तारखेला संपलेल्या आठवड्यातही चालूच राहिली. आता आलेखावर दोन महत्त्वाच्या आधार पातळ्या दिसून येतात.
 
१) २० दिवसांची बदलती सरासरी जी २४,३७० च्या आसपास आहे आणि 
२) बॉलिंगर बॅण्ड आकृतीमधला खालचा बँड म्हणजे २३,९९७ च्या आसपास.
सध्यातरी निफ्टी या दोन पातळ्यांमध्ये फिरेल असे वाटते.
 
या व्यतिरिक्त आणखी एक संकेत म्हणजे परदेशी वित्तसंस्थांनी केलेली निर्देशांकातील मंदीची मोर्चेबांधणी  - सद्यस्थितीत सर्व संस्थांचे मिळून निफ्टी फ्यूचर्समध्ये १,८६,०६० लाख मंदीचे सौदे उभे आहेत. कॅलेंडरमध्ये जरी सप्टेंबर उद्या चालू होणार असला तरी वायदेबाजारात सप्टेंबर वायद्यांची मालिका २६ ऑगस्टपासूनच चालू झाली आहे. महिन्याच्या सुरुवातीला जर एवढा मंदीचा डोलारा उभा असेल, तर कधी ना कधी तो कोसळण्याचीच शक्यता जास्त. थोडक्यात सांगायचे तर बॉलिंगर बॅण्डच्या नियमानुसार आणि निफ्टी फ्यूचरमधील मंदी पाहता, निफ्टीमध्ये एक उसळी येण्याची दाट शक्यता आहे. केव्हा ते पाहायचे.

(‘गुंतवणूक मित्र’ पुरवणीत प्रसिद्ध झालेल्या लेखांमधील मते त्या त्या तज्ज्ञांची आहेत. गुंतवणूकदारांनी गुंतवणुकीचा निर्णय आपल्या जबाबदारीवर घ्यावा.)

 

Related Articles