साखरेचे घाऊक दर घसरले; शेवगावात मात्र किलोमागे ६५ रुपये   

शेवगाव (वार्ताहर) : देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी केंद्र सरकारने विविध निर्णय घेतल्याने साखर कारखान्यांच्या टेंडर दरात सुमारे २० टक्क्यांनी घसरण झाली आहे. मात्र येथील बाजारपेठेत किरकोळ साखरेचा दर अद्याप ६५ रुपये किलो असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. घाऊक व्यापार्‍यांकडे जुना साठा असल्याने दर कमी होण्यास विलंब होत असल्याचे स्पष्ट झाले.
 
परिसरातील कारखान्यांच्या नुकत्याच झालेल्या टेंडरमध्ये एम-३० साखरेला सुमारे ५१०० रुपये, एस-३० ला ५००० रुपये, तर सुपर-३० ला ५०५० रुपये प्रतिक्विंटल दर मिळाल्याची माहिती आहे. त्यामुळे साखरेचे दर कमी होण्याचे संकेत असतानाही किरकोळ बाजारात त्याचा लाभ ग्राहकांना मिळत नसल्याची तक्रार आहे.
 
श्रावण, गणपती, नवरात्र, दसरा व दिवाळीच्या पार्श्वभूमीवर साखरेसह खाद्यतेल, डाळी, साबुदाणा व शेंगदाण्याच्या वाढलेल्या दरामुळे सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. प्रशासनाने साठ्यांची तपासणी करून ग्राहकांना कमी दराचा लाभ द्यावा, अशी मागणी होत आहे.
 

Related Articles