दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यासाठी अनीश सहस्रबुद्धे पंच   

सोलापूरसाठी अभिमानाचा क्षण

सोलापूर : भारतातील प्रतिष्ठित देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेल्या दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यासाठी सोलापूरचे अनीश सहस्रबुद्धे यांची पंच म्हणून निवड झाली आहे. त्यांच्या या निवडीमुळे सोलापूरच्या क्रिकेट क्षेत्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 
 
३० ऑगस्टपासून सुरू झालेला आणि चार दिवस चालणारा सेंट्रल झोन विरुद्ध ईस्ट झोन हा उपांत्य सामना अनीश सहस्रबुद्धे पंच म्हणून पार पाडणार आहेत. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर करण्यात येणार आहे. प्रतिष्ठेच्या स्पर्धेतील उपांत्य सामन्यासाठी पंच म्हणून संधी मिळाल्याने सहस्रबुद्धे यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
 
अनीश सहस्रबुद्धे यांच्या निवडीची माहिती समोर आल्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील क्रिकेटप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक पातळीवरून राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या सामन्यात पंच म्हणून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याने सोलापूरच्या क्रिकेट क्षेत्रासाठी ही गौरवास्पद बाब असल्याची भावना व्यक्त होत आहे. 
 
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या वतीने सहस्रबुद्धे यांचे अभिनंदन करण्यात आले. चेअरमन रणजितसिंह मोहिते पाटील, अध्यक्ष दिलीप माने, व्हाईस चेअरमन श्रीकांत मोरे, सेक्रेटरी धैर्यशिल मोहिते पाटील, उपाध्यक्ष प्रकाश भुतडा, मुकुंद जाधव आणि नितीन देशमुख यांच्यासह असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
 
दुलीप ट्रॉफीच्या उपांत्य सामन्यात पंच म्हणून काम करण्याची मिळालेली संधी ही सोलापूरच्या क्रिकेटसाठी प्रेरणादायी ठरणार असून, सहस्रबुद्धे यांच्या कामगिरीकडे आता क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
 

Related Articles