महाराष्ट्र साहित्य परिषद पिंपरी-चिंचवडच्या अध्यक्षपदी राजन लाखे   

पिंपरी : महाराष्ट्र साहित्य परिषद, पिंपरी-चिंचवड शाखेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष प्रा. राजन लाखे यांची बिनविरोध फेरनिवड करण्यात आली. विशेष म्हणजे अध्यक्षांसह १५ सदस्यांची संपूर्ण पंचवार्षिक कार्यकारिणीही बिनविरोध निवडण्यात आली.
 
चिंचवडगाव येथील काशीधाम मंगल कार्यालयात शनिवारी झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे जिल्हा प्रतिनिधी डॉ. पुरुषोत्तम काळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. कार्यवाह सुनील महाजन केंद्र निरीक्षक म्हणून, तर जिल्हा प्रतिनिधी प्रभाकर ओव्हाळ प्रमुख उपस्थित होते. सभेला १६४ सभासद उपस्थित होते.
 
एकूण १५ पदांसाठी १७ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. उपाध्यक्ष व कार्यवाह पदाच्या प्रत्येकी दोन जागांसाठी तीन-तीन अर्ज होते. मात्र निवडणूक अधिकार्‍यांच्या आवाहनानंतर प्रा. डॉ. सुभाष आहेर आणि प्रा. नरहरी वाघ यांनी उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे संपूर्ण कार्यकारिणीची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.
 
नूतन कार्यकारिणीत उपाध्यक्षपदी डॉ. रजनी शेठ व मकरंद बापट, कार्यवाहपदी संजय जगताप व गीता सुतार, तर कोषाध्यक्षपदी विजय नाईक यांची निवड झाली. कार्यकारिणी सदस्य म्हणून किरण लाखे, दत्तू ठोकळे, डॉ. मीनल लाड, किरण जोशी, नीलिमा फाटक, इला पवार, बाळासाहेब गोरे, अशोक होनराव आणि संजय होनकळस यांची निवड झाली.
 
आगामी शतकमहोत्सवी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर नूतन कार्यकारिणी शाखेचे कार्य अधिक व्यापक करेल, असा विश्वास सुनील महाजन यांनी व्यक्त केला.
 

Related Articles