ग्रामीण भागातून तंत्रज्ञान विश्वात नवनाथ दरेकरांची गगनभरारी   

दुबईत एमबीए ते पुण्यात यशस्वी आयटी कंपनी; हजारो युवकांना प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी
 
श्रीगोंदे तालुक्यातील हिरडगाव या ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील नवनाथ मोहन दरेकर यांनी मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर तंत्रज्ञान क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतलेल्या या युवकाने दुबईत एमबीए पूर्ण करून पुण्यात एनएमडी इन्फोटेक प्रा. लि. कंपनी उभारली आहे.
 
क्रिकेटचे स्वप्न आणि आयुष्याला नवे वळण
 
नवनाथ दरेकर यांना बालपणापासून क्रिकेटची विशेष आवड होती. चांडगाव येथे शिक्षण घेत असताना ते क्रिकेटपटू म्हणून पुढे येत होते. मात्र, क्रिकेटचा सराव करताना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना हे क्षेत्र सोडावे लागले. या कठीण प्रसंगानंतरही न डगमगता त्यांनी शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर घडविण्याचा निर्धार केला.
 
पार्टटाईम नोकरी करत पूर्ण केले शिक्षण
 
घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना त्यांनी पार्टटाईम नोकरी केली. त्यानंतर दुबईतील अमिटी विद्यापीठातून डिजिटल मार्केटिंगमध्ये एमबीएची पदवी घेतली. या काळात त्यांनी डेटा सायन्स, डेटा अ‍ॅनालिसिस आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे ज्ञानही आत्मसात केले.
पुण्यात उभारली 
 
एनएमडी इन्फोटेक
 
भारतामध्ये परतल्यानंतर नवनाथ दरेकर यांनी पुण्यात एनएमडी इन्फोटेक प्रा. लि. कंपनीची स्थापना केली. कंपनीच्या माध्यमातून अ‍ॅप आणि गेम डेव्हलपमेंट, डेटा सायन्स, क्लाउड कम्प्युटिंग, डिजिटल मार्केटिंग, सायबर सिक्युरिटी आणि आयटी कन्सल्टिंगसह विविध सेवा दिल्या जात आहेत.
 
हजारो विद्यार्थ्यांना प्रशिक्षणाची संधी
 
२०१९ ते मार्च २०२६ या कालावधीत सुमारे १० हजार विद्यार्थ्यांना विविध तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रशिक्षण देण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. यापैकी ५ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रात रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून अनेक युवकांनी स्वतःचे व्यवसाय सुरू केले आहेत.
 
राष्ट्रीय पुरस्काराने गौरव
 
नवनाथ दरेकर यांच्या कंपनीला २०२५ मध्ये ‘बेस्ट एआय कंपनी’ म्हणून नॅशनल आयकॉन पुरस्कार मिळाला. २०२४ मध्ये त्यांना ‘टायकून ऑफ महाराष्ट्र’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले.
 
लेखक आणि क्रिकेटप्रेमी
 
नवनाथ दरेकर यांनी डिजिटल मार्केटिंगवर ‘Revamping Business with Modern Marketing' हे पुस्तक लिहिले आहे. तसेच क्रिकेटवरील प्रेम कायम ठेवत पुण्यात ‘मास्टर क्लास क्रिकेट क्लब’ची स्थापना करून युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचे कामही ते करीत आहेत.
 
ग्रामीण भागातील युवकाने प्रतिकूल परिस्थितीवर मात करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून यशाचे नवे शिखर गाठत हजारो युवकांसाठी करिअरच्या संधी निर्माण केल्या आहेत. नवनाथ दरेकर यांचा हा प्रवास युवा पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरत आहे.
 

Related Articles