गणेशोत्सवापूर्वी दूर व्हावे खड्ड्यांचे ‘विघ्न’   

पिंपरी : सार्वजनिक गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. गणरायाच्या स्वागतासाठी पिंपरी-चिंचवडमधील सर्वच गणेशोत्सव मंडळांकडून मंडप उभारणीची लगबग सुरू आहे. मात्र शहरातील सर्वच रस्त्यांवरील खड्डे कायम आहेत. पावसामुळे डांबर उपलब्ध होत नसल्याने डांबरीकरणाऐवजी खड्डे बुजविण्यावर भर दिल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे डांबरी रस्त्यांऐवजी खड्ड्यांच्या रस्त्यांवरूनच गणरायाचे आगमन होईल, अशी सद्यःस्थिती आहे. मात्र गणेशोत्सवापूर्वी सर्व रस्त्यांचे डांबरीकरण होण्याची अपेक्षा गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
 
गणेशोत्सव १४ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. त्यानिमित्त गणरायाचे आगमन व विसर्जन मिरवणुका मंडळांकडून काढल्या जातात. त्यासाठी विविध प्रकारच्या वाहनांवर रथांची प्रतिकृती उभारून मूर्ती विराजमान केली जाते. मिरवणूक मार्ग खड्डेमय असल्यास अपघाताची शक्यता असते. त्यासाठी आगमन व विसर्जन मिरवणूक मार्गांचे डांबरीकरण आवश्यक आहे.

महत्त्वाचे मिरवणूक मार्ग

१) जुनी व नवी सांगवी - गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी विसर्जन मिरवणुका. मुख्य रस्त्यांसह पवना व मुळा नद्यांना जोडणारे मोठे रस्ते
२) वाकड, भोसरी - गणेशोत्सवाच्या नवव्या किंवा अनंत चतुर्दशीच्या आदल्या दिवशी विसर्जन मिरवणुका. वाकड परिसरातील आणि पुणे-नाशिक महामार्गासह 
भोसरी परिसरातील अंतर्गत मोठे रस्ते
 
३) पिंपरी - गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी नेहरूनगर, संत तुकारामनगर, खराळवाडी, मोरवाडी, काळेवाडी, लिंक रस्ता, पिंपरी कॅम्प व पिंपरी गावातील रस्त्यांवरून पवना नदी घाटांवर जाणार्‍या सर्वाधिक मिरवणुका
 
४) चिंचवड - गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी चिंचवडगाव, लिंकरस्ता, केशवनगर, गांधीपेठ, चिंचवड स्टेशन, बिजलीनगर, वाल्हेकरवाडी, पवनानगर, दळवीनगर, मोहननगर, विद्यानगर, काळभोरनगर, थेरगाव परिसरातून पवना नदी घाटांवर जाणार्‍या सर्वाधिक मिरवणुका
 
५) प्राधिकरण - प्राधिकरणातील गणेश तलावाकडे जाणार्‍या रस्त्यावरून निगडीगाव, आकुर्डीगाव, प्राधिकरण, यमुनानगर, ओटास्कीम, तळवडे, रुपीनगर भागातील मंडळांच्या सर्वाधिक मिरवणुका
 
६) हिंजवडी, माण, मारुंजी - गणेशोत्सवाच्या शेवटच्या दिवशी मुळा नदीला जोडणारे अंतर्गत रस्ते व आयटी पार्कमधील मुख्य रस्त्यांवर मिरवणुका
७) अन्य भाग - चिखली, चर्‍होली, मोशी, दिघी, बोपखेल, रावेत, किवळे, मामुर्डी, थेरगाव, पिंपळे सौदागर, रहाटणी, पिंपळे गुरव, ताथवडे, पुनावळे, पिंपळे निलख आदी भागातील मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सातव्या, नवव्या व उत्सवाच्या शेवटच्या दिवशी निघत असतात.

महापालिका म्हणते खड्डे नोंदवा

शहरातील खड्ड्यांची माहिती महापालिकेपर्यंत तातडीने पोहोचविण्यासाठी ‘स्मार्ट सारथी पीसीएमसी अ‍ॅप’द्वारे ‘खड्डे नोंदवा’ सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नागरिकांनी गुगल प्ले स्टोअर किंवा अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवरून स्मार्ट सारथी पीसीएमसी अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करावे. किंवा अगोदरच डाऊनलोड असल्यास त्यामधील ‘पीसीएमसी सेवा खड्डे नोंदवा’ पर्याय निवडून खड्ड्यांची माहिती, छायाचित्र, जीपीएसद्वारे अचूक ठिकाण, पत्ता, खड्ड्याचा अंदाजे आकार नोंदवावा. तक्रारदाराला तक्रार क्रमांक मिळेल. खड्डा बुजवल्यानंतर तक्रार बंद करून त्याची माहिती संबंधितांना दिली जाते.

Related Articles