प्रारूप मतदार यादी आज जाहीर होणार   

पुणे : मतदार याद्यांच्या विशेष सखोल फेरनिरीक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण करण्यात येत आहे. त्यानुसार राज्यातील मतदान केंद्रांची संख्या ३७ ने कमी होणार आहे. सध्या राज्यात १ लाख २५३ मतदान केंद्रे असून, प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाल्यानंतर ही संख्या १ लाख २१६ होणार आहे. मात्र, राज्यातील घटत्या संख्येच्या तुलनेत पुणे जिल्ह्यात मतदान केंद्रांची संख्या सातने वाढणार आहे. दरम्यान, आज (सोमवारी) प्रारूप मतदार यादी जाहीर होणार आहे.
 
मतदान केंद्रावरील मतदारांची कमाल मर्यादा १,२०० वरून १,३०० करण्यात आली आहे. त्यामुळे कमी मतदारसंख्या असलेली काही केंद्रे जवळच्या केंद्रांमध्ये विलीन करण्याचा प्रस्ताव आहे. जिल्ह्यात सध्या ८ हजार ४१७ मतदान केंद्रे आहेत. पुनर्रचनेनंतर त्यामध्ये सात केंद्रांची वाढ होऊन ही संख्या ८ हजार ४२४ होण्याची शक्यता आहे.
 
जिल्ह्यातील ज्या विधानसभा मतदारसंघांत मतदारांची संख्या निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आहे, तेथे एकूण ३८ नवीन मतदान केंद्रे प्रस्तावित करण्यात आली आहेत. त्यामध्ये भोसरी मतदारसंघात सर्वाधिक आठ केंद्रांची भर पडणार असून, तेथील केंद्रांची संख्या ४८३ वरून ४९१ होईल.

Related Articles