कात्रज-गुजरवाडी फाटा रस्ता होणार रुंद   

भूसंपादन, अतिक्रमण आणि वीजवाहिन्या स्थलांतराची प्रक्रिया सुरू

पुणे : कात्रज चौक ते गुजरवाडी फाटा या वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी महापालिकेने रस्ता रुंदीकरणाच्या दिशेने ठोस पावले उचलली आहेत. या मार्गाची विकास आराखड्यानुसार पाहणी करून प्रस्तावित रस्त्याची हद्द निश्चित करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाने दिले आहेत. शुक्रवारी अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी कात्रज चौक-मांगडेवाडी-सातारा रस्ता परिसराची संयुक्त पाहणी केली.
 
कात्रज-गुजरवाडी फाटा हा सातारा रस्त्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असून या भागातून मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा होते. कात्रज परिसरातील वाढती लोकसंख्या, नव्याने महापालिका हद्दीत समाविष्ट झालेली गावे आणि वाढलेली वाहतूक यामुळे या मार्गावर सातत्याने कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे विकास आराखड्यातील तरतुदीनुसार रस्त्याचे रुंदीकरण आणि आवश्यक नागरी सुविधा विकसित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

वीजखांब, केबल भूमिगत

रस्ता रुंदीकरणाच्या कामात अडथळा ठरणारे वीजखांब आणि वीजवाहिन्यांचेही स्थलांतर करण्यात येणार आहे. महावितरणच्या केबल भूमिगत करण्यासाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, आवश्यक त्या ठिकाणी वीजखांबही हलविले जाणार आहेत. यासाठी रस्ते विभागाने विद्युत विभागाशी समन्वय साधण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

झाडे आणि वन जमिनीचाही आढावा

प्रस्तावित रस्त्याच्या हद्दीत येणार्‍या झाडांचे पाहणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आवश्यकतेनुसार झाडे हटविण्यासाठी संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. तसेच रस्त्याच्या हद्दीत वन विभागाची जमीन येत असल्यास वन विभागाशी पत्रव्यवहार करून पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रुंदीकरणाच्या या कामामुळे कात्रज चौक ते गुजरवाडी फाटा या मार्गावरील वाहतुकीला मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भूसंपादन, अतिक्रमण, वीजवाहिन्या आणि अन्य तांत्रिक अडथळे दूर करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर राहणार आहे.

भूसंपादन विभागाकडून प्रक्रिया

प्रस्तावित रस्त्याच्या रुंदीमध्ये येणार्‍या खासगी जागांचे पाहणी करून आवश्यक जमिनीचा ताबा घेण्याची प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना भूसंपादन विभागाला देण्यात आल्या आहेत. तर रस्ते विभागाला रुंदीकरणासाठी लागणार्‍या विविध कामांचा सविस्तर अंदाज तयार करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानंतर या कामासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचे नियोजन आहे.

अतिक्रमणे हटविणार

रस्त्याच्या प्रस्तावित हद्दीत येणार्‍या अतिक्रमणांचेही पाहणी करण्यात येणार आहे. संबंधित क्षेत्रीय कार्यालयाला ही अतिक्रमणे हटविण्याच्या सुचना देण्यात येणार आहेत. कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रस्ता रुंदीकरणाच्या कामाला अतिक्रमणांचा अडथळा राहणार नाही, यासाठी प्रशासनाने स्वतंत्र कार्यवाही सुरू केली आहे.

पावसाच्या पाण्यासाठी स्वतंत्र वाहिनी

रस्ता रुंदीकरणासोबत पावसाच्या पाण्याचा निचरा व्यवस्थित व्हावा, यासाठी नव्या रस्त्याच्या हद्दीत पावसाळी पाण्याची वाहिनी विकसित करण्याचेही नियोजन आहे. त्यामुळे रुंदीकरण केवळ डांबरी रस्त्यापुरते मर्यादित न ठेवता त्यासोबत आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

Related Articles