कनिष्ठ अभियंता भरतीतील गैरप्रकाराची व्याप्ती किती?   

चौकशी पूर्ण होईपर्यंत नियुक्त्या थांबवा

पुणे : महापालिकेच्या कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या भरती परीक्षेत अत्याधुनिक साधनांचा वापर करून गैरप्रकार झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने केलेला खुलासा समाधानकारक नसल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रविराज काळे यांनी केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी पूर्ण होईपर्यंत भरतीची निवड यादी प्रसिद्ध करू नये तसेच कोणत्याही उमेदवाराला नियुक्तीपत्र देऊ नये, अशी मागणी त्यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
 
महापालिकेतील कनिष्ठ अभियंत्यांच्या १६९ पदांसाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली होती. राज्यभरातून या परीक्षेसाठी ४२ हजारांहून अधिक अर्ज प्राप्त झाले होते. त्यापैकी २० हजार ९३५ उमेदवारांनी परीक्षा दिली. परीक्षेनंतर पात्र उमेदवारांची प्रवर्गनिहाय यादी आठ जून रोजी महापालिकेला प्राप्त झाली. त्यानंतर निकाल जाहीर करून कागदपत्र पडताळणीची प्रक्रिया सुरू करण्यात आली.
 
मात्र, काही उमेदवारांनी प्रश्न सोडविण्याची पद्धत संशयास्पद असल्याचे परीक्षेचे काम करणार्‍या आयबीपीएसच्या तांत्रिक विश्लेषणातून समोर आले. आयबीपीएसने अतिरिक्त महापालिका आयुक्त प्रजित नायर यांना २७ ऑगस्ट रोजी पाठविलेल्या गोपनीय पत्रात गैरप्रकाराच्या संशयासंदर्भात विविध निरीक्षणे नोंदविली आहेत. 
 
उमेदवारांनी दिलेल्या चुकीच्या उत्तरांमधील साम्य, प्रश्न पाहण्याचा क्रम, उत्तर नोंदविण्यासाठी लागलेला वेळ आणि उत्तर देण्याची पद्धत यांचे सांख्यिकी व अनुभवाधारित विश्लेषण करण्यात आले. ठरावीक मयार्देपेक्षा अधिक साम्य आढळणार्‍या उत्तरांना गैरप्रकाराचा संभाव्य फिंगरप्रिंट मानले जात असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.
 
दरम्यान, कागदपत्र पडताळणीसाठीची यादी प्रसिद्ध झाल्यानंतर एक्स या समाजमाध्यमावर परीक्षेतील प्रश्न आणि त्याचे पर्याय असलेले छायाचित्र प्रसारित झाले. पडताळणीत संबंधित प्रश्न २३ एप्रिलच्या पहिल्या सत्रातील प्रत्यक्ष प्रश्नपत्रिकेतील असल्याचे आढळले. त्यानंतर संबंधित उमेदवारांचे परीक्षा लॉग तसेच परीक्षा केंद्रावरील हालचालींची चौकशी करण्यात आली.

पहिल्या ३० मिनिटांत स्वच्छतागृहाला भेट

छत्रपती संभाजीनगरमधील चिकलठाणा परीक्षा केंद्रावर परीक्षा दिलेल्या काही उमेदवारांनी परीक्षा सुरू झाल्यानंतर पहिल्या ३० मिनिटांत स्वच्छतागृहाला भेट दिल्याचे अहवालात नमूद आहे. त्यापूर्वी त्यांनी जवळपास सर्व प्रश्न पाहिले होते आणि त्यानंतर अत्यंत कमी कालावधीत सलग उत्तरे नोंदविल्याचे निरीक्षण करण्यात आले. काही उमेदवारांची रफशीट उपलब्ध नसल्याचे, तर काही उमेदवारांनी केलेले रफवर्क प्रश्नांच्या स्वरूपाशी सुसंगत नसल्याचेही अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तसेच एका उमेदवाराच्या प्रश्नपत्रिकेशी समाजमाध्यमावर प्रसारित झालेल्या छायाचित्राचा संबंध जोडता आल्याचे अहवालात नमूद आहे.

तीन उमेदवारांपुरता गैरप्रकार मर्यादित आहे का?

या प्रकरणात तीन उमेदवारांची उमेदवारी रद्द करण्यात आली असून, संबंधित उमेदवार आणि परीक्षा केंद्रावरील कर्मचाजयांसह पाच जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, एवढ्यापुरती कारवाई करून संपूर्ण भरती प्रक्रिया निर्दोष असल्याचा निष्कर्ष काढता येणार नाही, असे काळे यांनी म्हटले आहे. गैरप्रकार केवळ तीन उमेदवारांपुरता मर्यादित होता का, त्यामागे संघटित यंत्रणा कार्यरत होती का आणि इतर परीक्षा केंद्रांवरही अशाच प्रकारे गैरप्रकार झाला आहे का, याची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related Articles