’डीजे’विरूद्ध नागरिकांचा संताप   

पुणे : ’सण-उत्सव आनंद देतात, शिक्षा नाही’, ’अभय डीजे समर्थकांना नको, जनतेला द्या’, ’माझे डोळे, माझे कान, माझे हृदय, माझा अधिकार’ असे फळक हाती घेऊन डेक्कन परिसरातील गुडलक चौकात कलाकार कट्टा येथे डीजे मुक्तीसाठी नागरिकांनी रविवारी सकाळी आंदोलन केले.यावेळी आंदोलकांनी डीजेच्या कर्णकर्कश आवाजाविरूद्ध आपला तीव्र संताप व्यक्त केला. तसेच धार्मिक, सांस्कृतिक उत्सवात अश्लील गाणे वाजवून वातावरण बिघडवत असल्याचेही सांगितले. प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी आवाजाच्या तीव्रतेसंबंधी न्यायालयीन निकाल आणि कायदा असताना सुद्धा पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्त यांना नागरिकांच्या बाजूने उभे राहता येत नसल्यामुळे आम्हाला रस्त्यावर उतरावे लागल्याचा आरोप आंदोलकांनी केला. 
 
ध्वनी प्रदूषणामुळे लोकांच्या मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यावर परिणाम होतो, अशा स्थितीत सर्व पुणेकरांचा आरोग्य विमा महानगरपालिका काढणार आहे का? असा प्रश्नही विचारण्यात आला. त्याचबरोबर पुण्याचा गणेशोत्सव हा महाराष्ट्रासाठी आकर्षणाचा बिंदू असतो. त्यासाठी हजारो लोक मिरवणूक, सजावट, वादन, नृत्य पाहण्यासाठी शहरात येत असतात. मोठ्या डीजे डॉल्बी वा अश्लील नृत्य पाहण्यासाठी ते येत नाही, असे मत व्यक्त करण्यात आले.

Related Articles