गणेशोत्सवाच्या परंपरेचा काँग्रेसला अभिमान   

‘डीजे’च्या दणदणाटाला विरोध

पुणे : गणेशोत्सवाची चाहूल लागताच ध्वनिप्रदूषणाच्या मुद्द्यावरून पुण्यात राजकीय वातावरण तापू लागले आहे. गणेशोत्सवातील ‘डीजे’च्या दणदणाटाला आणि ध्वनिप्रदूषणाला काँग्रेसचे पुणे (पूर्व) शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी विरोध केला आहे. तसेच ‘डीजे’ला तार्किक आणि सभ्य भाषेत विरोध करणारे नागरिक विद्याधर बापट यांच्यावर टीका करताना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी केलेल्या वक्तव्याचाही जगताप यांनी समाचार घेतला आहे.
 
शहराने संपूर्ण देशाला आणि जगाला गणेशोत्सवाचे वैभव दाखवून दिले. समाजाला एकत्र आणणारा हा उत्सव साजरा करून पुण्याने जगासमोर आदर्श निर्माण केला. या उत्सवाचा काँग्रेसला अभिमान होता, आहे आणि यापुढेही राहील. मात्र, परंपरेच्या नावाखाली आणि राजकीय आशीर्वादाने सध्या ‘डीजे’चा दणदणाट सुरू झाला असून, त्यामुळे गणेशोत्सवाची प्रतिमा बदनाम होत असल्याची टीका प्रशांत जगताप यांनी केली.
 
उत्सव हा सर्वांना आनंद देणारा असतो. मात्र, मोठ्या आवाजामुळे ज्येष्ठ नागरिक, नवजात बालके, विशेष मुलांसह मुक्या प्राण्यांना त्रास होत असेल, तर आपणच आपल्या संस्कृतीचे स्वरूप बिघडवत आहोत का, असा प्रश्न निर्माण होतो. सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत अशा उन्मादाला बळ देणारे सरकार असल्याचा आरोपही जगताप यांनी केला.ध्वनिप्रदूषणाला विरोध करणार्‍या सामान्य नागरिकांना कुत्र्याची उपमा देण्यापर्यंत भाजपच्या शहराध्यक्षांची मजल गेली, हे दुर्दैवी आहे. नागरिकांच्या मतांचा आणि त्यांच्या अभिव्यक्तीच्या अधिकाराचा भाजपने सन्मान करावा, असेही जगताप यांनी म्हटले आहे.
 

Related Articles