कचरा उत्पादक मोठे; प्रक्रिया यंत्रणांची तपासणी मात्र कागदावरच   

अस्वच्छतेच्या १ लाख ६ हजार कारवाया

पुणे : शहरात दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा निर्माण करणार्‍या हॉटेल, उपाहारगृहे, व्यावसायिक आस्थापना आणि गृहनिर्माण संस्थांच्या कचरा प्रक्रिया यंत्रणा प्रत्यक्षात सुरू आहेत की केवळ कागदावर, याची तपासणी करण्यासाठी  महापालिकेने अद्याप स्वतंत्र आणि सर्वसमावेशक पाहणी केलेली नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे आणि अस्वच्छते प्रकरणी तीन वर्षांत तब्बल १ लाख ६ हजार ९८० कारवाया करून ५ कोटी ७ लाख ५२ हजार ९१५ रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. त्यामुळे किरकोळ उल्लंघनांवर कारवाईचा धडाका सुरू असताना मोठ्या कचरा उत्पादकांच्या प्रक्रिया यंत्रणांकडे मात्र दुर्लक्ष का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
 
नगरसेविका रेश्मा बराटे यांनी २४ जुलै रोजी विचारलेल्या प्रश्नाला प्रशासनाने दिलेल्या लेखी उत्तरातून ही बाब समोर आली. क्षेत्रीय कार्यालयांतील वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, आरोग्य निरीक्षक आणि मुकादम यांच्या माध्यमातून हॉटेल, व्यावसायिक आस्थापना आणि सोसायट्यांची तपासणी केली जात असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे. मात्र, शहरातील सर्व मोठ्या कचरा उत्पादकांच्या प्रक्रिया यंत्रणांची स्वतंत्र पाहणी झालेली नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
 
महापालिकेच्या आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये ३० हजार १२९, २०२४ मध्ये ३८ हजार ५४७ आणि २०२५ मध्ये ३८ हजार ३०४ कारवाया करण्यात आल्या. या कारवायांमधून अनुक्रमे ९५ लाख ६५ हजार २८ रुपये, १ कोटी ९४ लाख ६७ हजार १८९ रुपये आणि २ कोटी १७ लाख २० हजार ६९८ रुपये दंड वसूल करण्यात आला.

नियमांची अंमलबजावणी संशयाच्या भोवर्‍यात

घनकचरा व्यवस्थापन नियमांनुसार २० हजार चौरस मीटरपेक्षा अधिक क्षेत्रफळाच्या आस्थापना, दररोज ४० हजार लीटर पाणी वापरणार्‍या संस्था किंवा दररोज १०० किलो कचरा निर्माण करणार्‍या आस्थापनांना स्रोतस्थानीच कचरा प्रक्रिया करणे बंधनकारक आहे. मात्र, मोठ्या कचरा उत्पादकांच्या प्रक्रिया यंत्रणांचे स्वतंत्र सर्वेक्षणच झालेले नसल्याने या नियमांची प्रत्यक्षात कितपत अंमलबजावणी होते, यावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, घरगुती आणि सोसायटी स्तरावर कचरा प्रक्रिया वाढविण्यासाठी संस्था आणि व्यक्तींचे नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. मात्र, ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी कोणतीही निश्चित कालमर्यादा देण्यात आलेली नाही. 

मोठ्या कचरा उत्पादकांवर कारवाई नगण्य

मोठ्या कचरा उत्पादकांनी कचरा प्रक्रिया यंत्रणा बंद ठेवल्याप्रकरणी केवळ २९७ कारवाया करण्यात आल्या असून, त्यातून १७ लाख ५ हजार ४०० रुपये दंड वसूल झाला आहे. शहरात कचरा उत्पादकांची संख्या १ हजार ५९७ आहे. मात्र, त्यापैकी किती प्रक्रिया यंत्रणा प्रत्यक्ष सुरू आहेत, किती बंद आहेत आणि किती यंत्रणा निर्धारित क्षमतेनुसार कचर्‍यावर प्रक्रिया करतात, याचा सर्वसमावेशक अहवाल महापालिकेकडे उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
 

Related Articles