अर्जेंटिनाला महिला हॉकी विश्वचषक विजेतेपद   

एम्सटेलवीन : अर्जेंटिनाने शनिवारी रंगतदार अंतिम सामन्यात सहयजमान आणि नऊ वेळच्या विजेत्या नेदरलँडचा शूटआऊटमध्ये ३-१ असा पराभव करत महिला हॉकी विश्वचषकाचे विजेतेपद पटकावले. निर्धारित वेळेत दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत राहिल्यानंतर शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाने संयमी खेळ करत बाजी मारली. अर्जेंटिनाचे हे तिसरे विश्वविजेतेपद ठरले. 
 
शूटआऊटमध्ये अर्जेंटिनाकडून व्हिक्टोरिया ग्रानाटो, ब्रिसा ब्रगेसेर आणि सोफिया काइरो यांनी गोल केले. नेदरलँडकडून केवळ वीन मारिनला गोल करता आला. पिएन सँडर्स, फेलिस अल्बर्स आणि मोएस फ्रीके यांना संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. ेया विजयासह अर्जेंटिनाने मागील विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील पराभवाचा बदला घेतला. मागील स्पर्धेत नेदरलँड्सने अर्जेंटिनाचा ३-१ असा पराभव केला होता. यापूर्वी २००२ आणि २०१० मध्येही अर्जेंटिनाने नेदरलँड्सला पराभूत करत विश्वचषक जिंकला होता. दुसर्‍या क्वार्टरच्या अखेरच्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरवर जगातील अव्वल ड्रॅग-फ्लिकर यिब्बी यानसेनने अप्रतिम गोल करत संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. 
 
उत्तरार्धात अर्जेंटिनाने दबाव वाढवला. नेदरलँड्सची अनुभवी गोलरक्षक एन्ने वीनेंनडालने अनेक शानदार बचाव करत अर्जेंटिनाला रोखले. मात्र ५४व्या मिनिटाला गोरजेलानीची फ्लिक अडवताना गोलरक्षक घसरली आणि मिळालेल्या रिबाउंडवर कर्णधार मारिया ग्रानाटोने गोल करत सामना १-१ असा बरोबरीत आणला. उर्वरित वेळेत दोन्ही संघांना निर्णायक गोल करता आला नाही. 
 

Related Articles