टी-२० कर्णधारपदावरून हटवले तेव्हा धक्का बसला : सूर्यकुमार   

नवी दिल्ली : टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याने सूर्यकुमार यादवला मोठा धक्का बसला होता. तब्बल दोन महिने तो या निर्णयामागचे कारण समजून घेण्याचा प्रयत्न करत होता, असे भारताच्या माजी टी-२० कर्णधाराने सांगितले. त्याला कर्णधार पदावरून हटवण्याबरोबरच इंग्लंड दौर्‍यासाठीच्या टी-२० संघातूनही वगळण्यात आले.  त्याच्या जागी श्रेयस अय्यरकडे कर्णधारपद सोपवण्यात आले. सूर्यकुमारने सांगितले की, तो जवळपास ४०-५० दिवस घरी होता. या काळात क्रिकेटबाबत त्याच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. ‘आता काय करायचे? मला खेळायचे आहे की नाही?’ असे विचार मनात येत होते, असे त्याने सांगितले. या कठीण काळात पत्नीने त्याला २० वर्षांपूर्वी क्रिकेट खेळायला सुरुवात का केली, याची आठवण करून दिली आणि पुन्हा त्याच जुन्या जिद्दीने खेळण्याचा सल्ला दिला.
 
३५ वर्षीय सूर्यकुमार हा भारताच्या प्रमुख टी-२० फलंदाजांपैकी एक आहे. त्याने ११३ टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांत ३,२७२ धावा केल्या असून, त्याचा स्ट्राइक रेट १६२.९४ आणि फलंदाजीची सरासरी ३६.३५ आहे. २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकल्यानंतर मात्र त्याच्या कामगिरीत घसरण झाली. त्यानंतरच्या ४२ डावांत त्याने ९३२ धावा केल्या असून, केवळ सहा अर्धशतके झळकावली आहेत. संघातून वगळण्यात आल्यानंतरही आपण भावनांवर नियंत्रण ठेवले आणि हा निर्णय हसत स्वीकारला, असे सूर्यकुमारने सांगितले. ‘गेल्या दोन वर्षांत जेव्हा जेव्हा दबावाचा सामना केला किंवा गोष्टी माझ्या मनाप्रमाणे घडल्या नाहीत, तेव्हाही मी हसण्याचा प्रयत्न केला,’ असे तो म्हणाला. कर्णधारपदावरून हटवण्यात आल्याबाबत सूर्यकुमार म्हणाला, ‘मला याची अपेक्षा नव्हती. पुढील दोन वर्षे संघाला पुढे घेऊन जाण्याचे आणि त्यानंतर ऑलिम्पिक तसेच पुढील टी-२० विश्वचषकाची तयारी करण्याचे माझे नियोजन होते.’
 
मात्र, श्रेयस अय्यरला कर्णधार बनवण्याच्या निर्णयाचा आपण आदर करतो, असेही त्याने स्पष्ट केले. ‘मी श्रेयससोबत खूप क्रिकेट खेळलो आहे. तो चांगला खेळाडू, चांगला माणूस आणि चांगला कर्णधार आहे,’ असे सूर्यकुमारने सांगितले.‘हो, मी थोडा निराश होतो. कारण दोन वर्षांत आम्ही एकही मालिका गमावली नव्हती. विश्वचषक आणि आशिया कपही जिंकला होता. त्यामुळे सर्व काही चांगले सुरू असताना बदल का करण्यात आला, हा प्रश्न माझ्या मनात होता,’ असे त्याने सांगितले.
 

Related Articles