श्रीलंकेने महिला चॅम्पियन्स चषकाचे यजमानपद गमावले   

सरकारी हस्तक्षेपामुळे आयसीसीचा आक्षेप, दुसर्‍या देशात होणार स्पर्धा.

दुबई : २०२७ मध्ये होणार्‍या पहिल्या महिला चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेण्यात आले आहे. श्रीलंका क्रिकेटमध्ये सरकारच्या हस्तक्षेपावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने  आक्षेप घेतला आहे. आता १४ ते २८ फेब्रुवारीदरम्यान होणारी सहा संघांची ही स्पर्धा दुसर्‍या देशात खेळवली जाणार आहे.
 
श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे कामकाज सध्या सरकारने स्थापन केलेली ट्रान्सफॉर्मेशन कमिटी पाहत आहे. खउउच्या नियमानुसार, सदस्य क्रिकेट बोर्डाने सरकारी हस्तक्षेपाशिवाय स्वतंत्रपणे काम करणे अपेक्षित आहे. ट्रान्सफॉर्मेशन कमिटीचे सचिव प्रकाश शाफ्टर यांनी श्रीलंकेकडून यजमानपद काढून घेतल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की, ही स्पर्धा श्रीलंकेबाहेर आयोजित केली जाईल; मात्र नव्या यजमान देशाचा निर्णय अद्याप झालेला नाही.आयसीसी हे श्रीलंकेत लवकर निवडणुका घेऊन निर्वाचित क्रिकेट बोर्ड पुन्हा कार्यरत करण्याची मागणी करत आहे. ट्रान्सफॉर्मेशन कमिटीच्या प्रतिनिधींना खउउ बोर्डाच्या बैठकींमध्ये सहभागी होण्याची परवानगीही देण्यात आलेली नाही. महिला चॅम्पियन्स ट्रॉफी १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान टी-२० फॉरमॅटमध्ये खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार होते. यजमान देश असल्याने श्रीलंकेला स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार होता. मात्र आता यजमान देश बदलण्यात आल्याने श्रीलंकेच्या सहभागावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. श्रीलंका सध्या महिला वनडे क्रमवारीत सहाव्या स्थानावर आहे. आयसीसीने अद्याप नव्या पात्रता प्रक्रियेबाबत स्पष्ट माहिती दिलेली नाही.

यजमानपद गमावल्याने पर्यटन क्षेत्रालाही फटका

स्पर्धा दुसर्‍या देशात गेल्याने श्रीलंकेला क्रिकेटसोबतच आर्थिक नुकसानही होण्याची शक्यता आहे. विविध संघ, अधिकारी आणि प्रेक्षकांच्या आगमनामुळे स्थानिक हॉटेल आणि पर्यटन व्यवसायाला मोठा फायदा होणार होता. याशिवाय प्रसारण हक्क आणि स्पर्धेच्या आयोजनातून मिळणार्‍या उत्पन्नातील श्रीलंकेचा वाटाही गमावला जाणार आहे. तसेच देशांतर्गत क्रिकेटला आयोजनाशी संबंधित मिळणार्‍या संधींवरही परिणाम होणार आहे.

२०२३ मध्येही आयसीसीने केले होते निलंबित

सरकारी हस्तक्षेपाच्या मुद्द्यावर श्रीलंकेला यापूर्वीही आयसीसीच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. २०२३ मध्ये खउउने श्रीलंका क्रिकेटला निलंबित केले होते. त्यानंतर २०२४च्या पुरुष अंडर-१९ विश्वचषकाचे यजमानपदही श्रीलंकेकडून काढून घेऊन दक्षिण आफ्रिकेला देण्यात आले होते. एप्रिल २०२६ मध्ये श्रीलंका सरकारने क्रिकेट बोर्डाचे कामकाज तात्पुरते ट्रान्सफॉर्मेशन कमिटीकडे सोपवले होते. तेव्हापासून खउउ निर्वाचित क्रिकेट बोर्डाची पुनर्स्थापना आणि लवकरात लवकर निवडणुका घेण्यावर भर देत आहे.
 

Related Articles