ज्ञानपरंपरेचा दीपस्तंभ : वेदशास्त्रोत्तेजक सभा   

डॉ. गीताली टिळक,अध्यक्ष, वेदशास्त्रोत्तेजक सभा, पुणे

ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करणार्‍या पुण्याच्या वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या वर्धापन दिनानिमित्त...

प्राचीन भारतीय संस्कृतीची जडणघडण ज्ञान, चिंतन, साधना आणि अनुभव यांच्या समृद्ध परंपरेतून झाली आहे. वेद, उपनिषदे, दर्शने, संस्कृत साहित्य आणि विविध शास्त्रग्रंथांनी भारतीय समाजाला केवळ धार्मिक अधिष्ठान दिले नाही, तर मानवी जीवनाकडे पाहण्याची व्यापक दृष्टीही दिली. या अमूल्य ज्ञानपरंपरेचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याचे कार्य गेली दीडशे वर्षे सातत्याने करणारी पुण्यातील एक महत्त्वाची संस्था म्हणजे ‘वेदशास्त्रोत्तेजक सभा’.
 
३१ ऑगस्ट १८७५ रोजी स्थापन झालेली ही संस्था आज आपल्या १५१व्या स्थापना दिनाचे औचित्यपूर्ण पर्व साजरे करीत आहे. या संस्थेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना मला अभिमानाबरोबरच या प्रदीर्घ परंपरेची जाणीव आणि भविष्यातील कार्याची मोठी जबाबदारीही जाणवते. पूर्वसुरींनी प्रामाणिकपणे जतन केलेला हा ज्ञानाचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे, हे आता आपल्या सर्वांचे सामूहिक कर्तव्य आहे.
 
ब्रिटिश राजवटीच्या काळात पाश्चात्त्य शिक्षणपद्धतीचा प्रसार होत असताना प्राचीन भारतीय वेदविद्या आणि शास्त्रविद्येच्या अध्ययनाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. पारंपरिक पाठशाळांची संख्या कमी होत होती. संस्कृत भाषेबरोबरच वेदाध्ययनाची परंपराही क्षीण होण्याचा धोका निर्माण झाला होता. या परिस्थितीचा विचार करून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे आणि विद्वान कवीश्वर महादेव मोरेश्वर कुंटे यांच्या पुढाकाराने पुण्यातील तत्कालीन प्रतिष्ठित वैदिक विद्वान व शास्त्री यांची सभा बोलावण्यात आली. या विचारमंथनातून प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या रक्षणासाठी ‘वेदशास्त्रोत्तेजक सभा’ या संस्थेची स्थापना करण्यात आली. भारतीय संस्कृतीच्या इतिहासातील तो एक दूरदृष्टीचा आणि अत्यंत महत्त्वाचा निर्णय होता.

लोकमान्य टिळक आणि सभेचा इतिहास

वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या १५१ वर्षांच्या प्रवासात अनेक विद्वान, अभ्यासक आणि समाजधुरीणांनी संस्थेला दिशा दिली. त्यामध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या योगदानाचा विशेष उल्लेख करावा लागेल. लोकमान्य टिळक यांनी या संस्थेचे अध्यक्षपद स्वीकारून तिच्या कार्याला व्यापक वैचारिक अधिष्ठान दिले. स्वराज्याची चळवळ, ‘केसरी’ आणि ‘मराठा’ या वृत्तपत्रांचे संपादन, सार्वजनिक गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सव अशा अनेक सामाजिक व राष्ट्रीय कार्यांमध्ये व्यस्त असतानाही त्यांनी वेद, संस्कृत आणि प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेच्या अभ्यासाला विशेष महत्त्व दिले. वेदांमध्ये पृथ्वी, अंतरिक्ष, निसर्ग, कालगणना, मानवी जीवन आणि विश्वरचनेसंबंधी असलेल्या चिंतनाचा त्यांनी चिकित्सक अभ्यास केला. ‘ओरायन’ आणि ‘दि आर्क्टिक होम इन द वेदाज’ यांसारख्या त्यांच्या ग्रंथांमधून ही व्यासंगी दृष्टी स्पष्टपणे दिसते. अध्यात्म, विज्ञान, तर्क आणि राष्ट्रीय स्वाभिमान यांचा समन्वय साधणारी ही परंपरा आजही सभेला प्रेरणा देते.
 
१९७७ ते २००१ या कालखंडात कै. जयंतराव टिळक यांनी सभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळली. सभेला स्वतंत्र वास्तू, कार्यालय आणि उपक्रमांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यामध्ये त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान होते. सन २००७ पासून डॉ. दीपक टिळक यांनी सभेच्या अध्यक्षपदाची धुरा समर्थपणे सांभाळली. संगणक, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सभेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी त्यांनी अनेक प्रकल्प सुरू केले. सभेच्या १५०व्या वर्षापर्यंतच्या वाटचालीमध्ये त्यांचे मोलाचे योगदान राहिले. त्यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना त्यांनी दाखविलेल्या मार्गाचे स्मरण आणि सभेच्या भविष्याचा संकल्प मनात आहे.

वेद आणि शास्त्रांच्या परीक्षांची परंपरा

स्थापनेपासूनच वेद आणि शास्त्रांच्या अभ्यासाला शैक्षणिक मानदंड प्राप्त करून देणे, हे सभेचे प्रमुख उद्दिष्ट राहिले. संस्थेने वेदविद्येचे अभ्यासक्रम तयार करून विद्यार्थ्यांसाठी परीक्षा घेण्यास प्रारंभ केला. पारंपरिक ज्ञानाचे केवळ स्मरण न राहता त्याचे शिस्तबद्ध अध्ययन, अध्यापन आणि मूल्यमापन व्हावे, हा त्यामागील उद्देश होता. सभेतर्फे ऋग्वेद, यजुर्वेद आणि सामवेदाबरोबरच न्याय, व्याकरण, वेदान्त, अलंकार, ज्योतिष, धर्मशास्त्र आणि संबंधित विषयांच्या परीक्षा घेतल्या जातात. भारतातील विविध राज्यांतील विद्यार्थी या परीक्षांमध्ये सहभागी होतात. परीक्षा उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे, पारितोषिके आणि विद्वानांच्या स्मरणार्थ गौरव प्रदान केला जातो. या परीक्षांना राष्ट्रीय संस्कृत विद्यापीठ, नवी दिल्ली तसेच विविध मान्यताप्राप्त संस्थांचे शैक्षणिक पाठबळ लाभले आहे. पारंपरिक गुरुकुलांमधून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना औपचारिक मान्यता मिळवून देण्याच्या दृष्टीने ही परीक्षा पद्धती अत्यंत महत्त्वाची ठरली आहे.

ग्रंथालय आणि हस्तलिखितांचा अमूल्य ठेवा

सभेकडे संस्कृत भाषेतील सुमारे सहा हजार ग्रंथांचे समृद्ध ग्रंथालय आहे. सुमारे साडेतीन हजार प्राचीन हस्तलिखितांचा दुर्मीळ संग्रह संस्थेने जतन केला आहे. या हस्तलिखितांमध्ये वेद, दर्शने, व्याकरण, ज्योतिष, आयुर्वेद, धर्मशास्त्र, तत्त्वज्ञान आणि साहित्याशी संबंधित महत्त्वपूर्ण ग्रंथांचा समावेश आहे. हस्तलिखिते ही आपल्या सांस्कृतिक स्मृतीची जिवंत साक्ष आहेत. काळाच्या ओघात त्यांची झीज होऊ नये म्हणून त्यांचे शास्त्रीय पद्धतीने संवर्धन आणि डिजिटलायझेशन करण्याचे कार्य हाती घेण्यात आले आहे. या हस्तलिखितांचे अभ्यासकांसाठी वर्गीकरण, सूचीकरण आणि सुलभ उपलब्धता निर्माण करणे, ही आगामी काळातील महत्त्वाची दिशा असेल. सभेने ‘वेदशास्त्रदीपिका’, ‘प्राचीन भारतीय विद्येचे यथार्थ दर्शन’ आणि ‘प्राचीन भारतीय विद्येचे पुनर्दर्शन’ यांसारखे महत्त्वपूर्ण ग्रंथ प्रकाशित केले आहेत. वेदशाखांच्या अभ्यासासाठी स्वतंत्र ग्रंथही तयार करण्यात आले आहेत. भविष्यातही संशोधनाधारित आणि सामान्य वाचकांना समजेल अशा ग्रंथांच्या प्रकाशनावर भर दिला जाईल.

वेदध्वनीचे जतन

वेद हजारो वर्षे मौखिक परंपरेतून एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे आले आहेत. प्रत्येक वेदशाखेची पठणपद्धती, स्वर, उच्चार आणि लय वेगळी आहे. एखादा उच्चार किंवा स्वर बदलल्यास मंत्राचा अर्थ आणि त्याचे मूळ स्वरूप बदलू शकते. त्यामुळे शुद्ध वेदपठणाचे ध्वनिमुद्रण करून ही परंपरा सुरक्षित ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सभेने ऋग्वेद, सामवेद आणि सामवेदाच्या राणायनीय शाखेतील काही भागांचे ध्वनिमुद्रण पूर्ण केले आहे. ऋग्वेदातील दुर्मीळ पठणपद्धतींचे ध्वनिमुद्रण आणि डिजिटल जतन करण्याचे कामही सुरू आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून प्राचीन मौखिक परंपरेचे संरक्षण कसे करता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.

यज्ञीय पात्रांची प्रदर्शनी

सामान्य जनतेला प्राचीन यज्ञसंस्कृतीची ओळख करून देण्याच्या उद्देशाने यज्ञीय पात्रांची कायमस्वरूपी प्रदर्शनी उभारण्याचा सभेचा संकल्प आहे. या प्रदर्शनात विविध यज्ञांमध्ये वापरल्या जाणार्‍या पात्रांच्या प्रतिकृती, त्यांची नावे, उपयोग आणि त्यामागील शास्त्रीय संकल्पना समजावून सांगितल्या जातील. आजच्या पिढीला भारतीय परंपरांचा परिचय केवळ ग्रंथांमधून नव्हे, तर दृश्य आणि अनुभवाधारित माध्यमांमधून करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे हे प्रदर्शन विद्यार्थी, संशोधक आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी ज्ञानवर्धक ठरेल.

लोकाश्रय हीच संस्थेची खरी शक्ती

वेदशास्त्रोत्तेजक सभा ही लोकाश्रयातून उभी राहिलेली संस्था आहे. प्राचीन ज्ञानपरंपरेचे संरक्षण करणे ही केवळ एखाद्या संस्थेची अथवा काही विद्वानांची जबाबदारी नाही; ते संपूर्ण समाजाचे सांस्कृतिक कर्तव्य आहे.

श्रीमद्भगवद्गीतेत म्हटले आहे-‘इहैव तैर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः|’

समत्व, विवेक, निःस्वार्थ कर्म आणि मानवकल्याण ही भारतीय तत्त्वज्ञानाची मूलभूत मूल्ये आहेत. वेदांचे आणि शास्त्रांचे रक्षण करताना आपण प्रत्यक्षात समाजाच्या विवेकशीलतेचे आणि सांस्कृतिक आत्मभानाचे रक्षण करीत असतो. सभेचे कार्य अधिक व्यापक करण्यासाठी समाजातील व्यक्ती, संस्था, उद्योगसमूह आणि अभ्यासक यांनी आर्थिक तसेच बौद्धिक सहकार्य करणे आवश्यक आहे. देणगीच्या रूपाने मिळणारा प्रत्येक हातभार एखाद्या हस्तलिखिताचे संवर्धन करू शकतो, एखाद्या वेदविद्यार्थ्याच्या शिक्षणाला मदत करू शकतो किंवा दुर्मीळ वेदशाखेचे ध्वनिमुद्रण भावी पिढ्यांसाठी सुरक्षित ठेवू शकतो.

नव्या पर्वाची दिशा

सभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारताना परंपरेचे जतन आणि काळानुरूप परिवर्तन ही दोन प्रमुख उद्दिष्टे माझ्यासमोर आहेत. वेद आणि शास्त्रांचे ज्ञान केवळ मर्यादित अभ्यासकांपुरते न राहता विद्यार्थी, युवक, संशोधक आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यासाठी आगामी काळात अभ्यासक्रमांचे आधुनिकीकरण, ऑनलाइन व ऑफलाइन अध्यापन वर्ग, डिजिटल ग्रंथालय, हस्तलिखितांचे सूचीकरण, संशोधन प्रकल्प, ध्वनिमुद्रित वेदपाठ, व्याख्यानमाला, परिसंवाद, शैक्षणिक संस्थांशी सहकार्य आणि युवा पिढीसाठी संवादात्मक उपक्रम यांवर भर देण्याचा मानस आहे. वेदांतील ज्ञान आधुनिक विज्ञानाच्या कसोटीवर समजून घेण्यासाठी शास्त्रज्ञ, संस्कृत पंडित, तत्त्वज्ञ, इतिहासकार आणि विविध विद्याशाखांतील संशोधक यांना एका व्यासपीठावर आणण्याची आवश्यकता आहे. चिकित्सक दृष्टीने परंपरेचा अभ्यास करणे आणि तिच्यातील मानवकल्याणकारी विचार वर्तमान जीवनाशी जोडणे, ही सभेची भूमिका राहील.
 
वेदशास्त्रोत्तेजक सभेची १५१ वर्षांची वाटचाल ही काही व्यक्तींची नव्हे, तर अनेक पिढ्यांतील विद्वान, वेदपाठी, शिक्षक, विद्यार्थी, विश्वस्त, देणगीदार आणि हितचिंतक यांच्या सामूहिक तपश्चर्येची फलश्रुती आहे. या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करताना, सभेच्या कार्याला अधिक व्यापक आणि तंत्रज्ञानस्नेही स्वरूप देण्याचा संकल्प मी व्यक्त करते. पूर्वसुरींनी प्रज्वलित केलेला ज्ञानदीप अधिक तेजस्वी करून तो पुढील पिढीच्या हाती सोपविणे, हीच वेदशास्त्रोत्तेजक सभेच्या १५१व्या स्थापना दिनानिमित्त खरी कृतज्ञता ठरेल.

Related Articles