जयपूरची दोन केंद्रे सोडून देशात नीट -पीजी परीक्षा पार   

नवी दिल्ली /जयपूर : वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट पीजी २०२६ ची परीक्षा रविवारी राजस्तानातील जयपूरची दोन केंद्रे वगळून देशात पार पडली. जयपूरमध्ये परीक्षेवेळी केंद्रांतील वीजपुरवठ्यात व्यत्यय आला होता. त्यामुळे परीक्षा ५ सप्टेंबरला दुपारी ३ वाजता घेतली जाणार आहे, असे वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने (एनबीईएमएस) जाहीर केले
 
दरम्यान, परीक्षा काल देशभरातील १ हजार १११ केंद्रावर यशस्वीपणे पार पडली असून २.६ लाख उमेदवारांनी ती दिली. जयपूरच्या सीतापूरामधील दोन आयओए डिजिटल झोन केंद्रात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे आणि यंत्रणेत वारंवार व्यत्यय आल्याने उमेदवारांना परीक्षा देता आली नाही. टीसीएस लिमिटेडच्या वतीने परीक्षेचे आयोजन केले होते. यानंतर वैद्यकीय विज्ञान परीक्षा मंडळाने तातडीची बैठक घेतली. परीक्षा आयोजक संस्थेवर कारवाई करण्याचे आणि जबाबदारी निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. फेरपरीक्षेबाबत पुढील तपशील त्यामध्ये ठिकाण, सुधारीत प्रवेशपत्र याची माहिती उमेदवारांना स्वतंत्रपणे कळवण्यात येणार आहे. परीक्षेतील व्यत्ययाबाबत आणि उमेदवारांना झालेल्या त्रासाबद्दल मंडळाने दिलगिरी व्यक्त केली असून फेरपरीक्षेसाठी व्यवस्था केली जाईल, असे स्पष्ट केले.

सहा,सात वेळा यंत्रणा बंद पडली

जयपूरमधील दोन केंद्रातील परीक्षेदरम्यान सहा ते सात वेळा यंत्रणा बंद पडली तर अन्य जणांनी वारंवार व्यत्यय आल्याची माहिती दिली. यंत्रणा सुरू झाल्यानंतर संगणकावर काही प्रश्न दिसले नंतर यंत्रणा बंद पडली. अनेक विद्यार्थी केंद्राबाहेर आले आणि त्यांनी निदर्शने केली तांत्रिक व्यवस्थेबाबत प्रश्नही उपस्थित केेले. व्यत्ययाबात कर्मचार्‍यांनी स्पष्ट खुलासा केला नाही,  उमेदवारांनी परीक्षेच्या गोपनीयतेबाबत आणि निष्पक्षतेबाबतही चिंता व्यक्त केली; प्रणाली बंद पडण्यापूर्वीच काही संगणक स्क्रीनवर प्रश्न दिसले होते, असा दावा त्यांनी केला. त्यांनी या व्यत्ययांची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली आणि तांत्रिक बिघाडांमुळे उमेदवारांचे नुकसान होणार नाही, याची परीक्षा प्राधिकरणाने खात्री करावी, असे म्हटले.

Related Articles