अडीच हजार नागरिक अजूनही बेपत्ता   

बळींची संख्या ६२६ वर

काठमांडू : नेपाळमधील विनाशकारी महापुरातील बळींची संख्या शनिवारी ६२६ वर पोहोचली. मागील चार दिवसांपासून बचाव पथके शोध आणि मदत कार्यात गुंतली आहेत. आतापर्यंत, २,५०० हून अधिक जणांची सुटका कण्यात आली आहे. मात्र, अद्यापही २,४०० हून अधिक बेपत्ता आहेत.दिवसेंदिवस बळींची आणि बेपत्ता नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. यासोबतच, स्वकीयांकडून बेपत्ता नागरिकांबद्दलची चिंता वाढत चालली आहे.
 
बुधवारी नेपाळ-तिबेट सीमेजवळील डोंगराळ भागात हिमनदीचा काही भाग कोसळला. त्यानंतर, मोठ्या प्रमाणात बर्फ आणि खडकांचा मोठा लोंढा खाली आला. यामुळे मध्य नेपाळमधील काही जिल्ह्यांत मोठा महापूर आला. यात अनेक घरे, वाहने, रस्ते आणि पूल वाहून गेले. तसेच, जलविद्युत प्रकल्पांचेही नुकसान झाले. भोते कोशी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्यामुळे पुराचा आणखी एक धोका वर्तविला जात आहे. 
 
पूरग्रस्त भागात सर्वत्र चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. अनेक घरे आणि इमारती अक्षरशः चिखलांनी भरली आहेत. मोठ-मोठी वाहने मलब्यात गाडली गेली आहेत. आतापर्यंत ६२६ जणांचे मृतदेह हाती लागली आहेत, असे नेपाळ राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाने सांगितले. मागील चार दिवसांपासून पाच हजार लष्करी जवानांसह ११ हजारांहून अधिक सुरक्षा कर्मचारी शोध आणि बचाव कार्यात गुंतले आहेत. 
 
भारताने स्थानिक प्रशासनाला मदत करण्यासाठी वैद्यकीय कर्मचारी आणि बोगद्यांमधील बचाव कार्यातील तज्ज्ञांचे पथक नेपाळला पाठवले आहे.आतापर्यंत २,४६५ जणांची सुरक्षित सुटका करण्यात आली आहे. यामध्ये १६३ परदेशी नागरिकांचा समावेश आहे. यात ११३ भारतीय, २६ चिनी, १५ दक्षिण कोरियन, चार जर्मन, इटली आणि अमेरिकेचे प्रत्येकी दोन आणि एका ओमानी नागरिकाचा समावेश आहे. त्रिशुली आणि रसुवा येथीलजलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमधून १९१ कामगारांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले असल्याचे नेपाळ लष्कराच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. 
 
सुरक्षित स्थळी आश्रय देण्यात आलेल्या २,२६५ जणांची हेलिकॉप्टरद्वारे सुटका करण्यात आली, असेही त्यांनी सांगितले.धुंचे आणि त्रिशूली येथे आपत्कालीन आरोग्य केंद्रे उभारण्या आली आहे. या ठिकाणी १,७०६ जणांना वैद्यकीय मदत परविण्यात आले, असे सांगण्यात आले. दरम्यान, मुग्लिंग-काठमांडू महामार्गावरील वाहतूक चार दिवसांंनंतर पुन्हा सुरू झाली, अशी माहिती नेपाळ पोलिसांनी दिली. मागील चार दिवसांपासून मध्य नेपाळमधील राष्ट्रीय महामार्ग आणि अनेक प्रमुख रस्ते बंद आहेत. 

Related Articles