चारित्र्याशिवाय पदवीला अर्थ नाही : राजनाथ   

लखनौ : शिक्षणामुळे पदवी जरुर मिळेल. पण, चारित्र्य घडविले तरच पदवीला अर्थ राहणार आहे..त्यामुळे शिक्षणासोबत चारित्र्य घडविण्याकडे लक्ष द्यावे, असे आवाहन संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी विद्यार्थ्यांना केले.
 
डॉ. बाबासाहेब भीमराव आंबेडकर विद्यापीठाच्या ११ व्या पदवी प्रदान सोहळ्यात सिंह बोलत होते. ते म्हणाले, शिक्षण केवळ पदवी देते, पण चारित्र्य घडवू न शकणारे शिक्षण फारसे मोलाचे नसते आणि ते अपूर्ण असते. मूल्ये खोलवर रुजली असतील तरच यशाला महत्त्व प्राप्त होते. विद्यार्थ्यांनी द्वेषभावना त्यागून विशाल द़ृष्टिकोनाचा विकास करावा. एखाद्या व्यक्तीचा दृष्टिकोन विस्तारल्याने सुख आणि समाधान वाढते. मन विशाल असणार्‍याचे  मनही शुद्ध असते. संकुचित वृत्तीच्या व्यक्तीचे मन कधीही शुद्ध असू शकत नाही, असे ते म्हणाले. या वेळी त्यांनी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे विचार प्रकट केले. संकुचित विचारांनी कोणीही महान बनत नाही आणि खचलेल्या मनोबलासह कोणीही ठामपणे उभे राहू शकत नाही.
 
या वेळी त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संघर्षाचाही उल्लेख केला आणि सांगितले की, भेदभाव सहन करावा लागूनही त्यांनी हिंसाचाराचा किंवा नशिबाला दोष देण्याचा मार्ग निवडला नाही. केवळ शिक्षणाचा मार्ग स्वीकारला होता. या प्रसंगी त्यांनी विद्यापीठातील वैयक्तिक विकास केंद्राचे उद्घाटन केले. एखाद्या संस्थेला आंबेडकरांचे नाव दिले जाते, तेव्हा अपेक्षा अधिकच वाढतात, असेही ते म्हणाले. कौशल्य आणि ज्ञानासह मूल्ये आणि संवेदशीलता महत्त्वाची आहे. त्याशिवाय ज्ञान अपूर्णच राहते. संवेदनशीलता नसेल तर व्यक्तिमत्त्वाला अर्थ उरत नाही, असेही त्यांनी सांगितले. 
 

Related Articles