एनआयएच्या आरोपपत्राची दिल्ली न्यायालयाकडून दखल   

लाल किल्ला स्फोट प्रकरण 

नवी दिल्ली : लाल किल्ला परिसरातील मेट्रो स्थानकाजवळील स्फोट प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) दाखल केलेल्या साडेसात हजार पानांच्या आरोपपत्राची  दिल्ली न्यायालयाने शनिवारी दखल घेतली. १० नोव्हेंबर २०२५ रोजी एका मोटारीत हा स्फोट झाला होता. ही मोटार डॉ. उमर उन नबी चालवत होता. या स्फोटात उमरसह ११ जणांचा मृत्यू झाला होता. तर, अनेक जण जखमी झाले होते.
 
विशेष न्यायाधीश प्रशांत शर्मा यांनी एनआयएच्या आरोपपत्राची दखल घेत, या प्रकरणावर ९ सप्टेंबरला सुनावणी ठेवली आहे.एनआयएने १४ मे रोजी १० जणांविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते.मुख्य आरोपी डॉ. उमर उन नबी यासह सर्व १० आरोपींचा अन्सार गझवत-उल-हिंद या संघटनेशी संबंध होता. ही संघटना अल कायदाशी संबंधित आहे, असे आरोपपत्रात एनआयएने नमूद केले होते.
 
२७ जून रोजी एनआयएने पुरवणी आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात एका फरारी बालरोगतज्ज्ञाचा समावेश आहे. या प्रकरणात आतापर्यंत डॉ. मुझम्मिल अहमद गनई ऊर्फ मुसैब, शाहीन शाहिद, आदील मजीद  आरिफ निसार दार ऊर्फ साहिल, यासिर-उल-अशरफ, मकसूद अहमद दार ऊर्फ शाहिद, मौलवी इरफान अहमद, जमीर अहमद अहंगर ऊर्फ मुथलाशा, मौलवी इश्तियाक यांना अटक झाली आहे.
 

Related Articles