महाराष्ट्रातील ६६ पर्यटकांचा ठावठिकाणा लागेना   

नेपाळमधील जलप्रलय 

बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांची चिंता वाढली

मुंबई, (प्रतिनिधी) : नेपाळवर  महाभीषण जलप्रलयाचे संकट  कोसळून चार दिवस उलटल्यानंतरही महाराष्ट्रातील ६६  पर्यटकांचा अद्याप ठावठिकाणा लागलेला नाही. त्यामुळे बेपत्ता नागरिकांच्या कुटुंबीयांची आणि मित्र परिवाराची चिंता वाढली आहे. संपर्क होऊ न शकलेल्या पर्यटकांमध्ये  ‘रिचा टूर्स’ या ट्रॅव्हल कंपनीकडून प्रवासाला गेलेल्या ६० पर्यटकांच्या गटाचा समावेश आहे.
 
राज्य आपत्ती व्यवस्थापन विभागाने नेपाळमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या नागरिकांच्या सद्यस्थितीबाबत  शनिवारी माहिती दिली. त्यानुसार, नेपाळमध्ये महाराष्ट्रातील ४०४ नागरिक अजूनही अडकून पडले आहेत. यापैकी ३३८ नागरिकांशी संपर्क प्रस्थापित झाला असून ते सुरक्षित आहेत. मात्र, ६६ नागरिकांशी अद्याप थेट संपर्क होऊ शकलेला नाही.
 
नेपाळ-तिबेट प्रदेशातील अनेक जिल्ह्यांना पुराचा मोठा फटका बसला असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या भागात अनेक भारतीय नागरिक अडकून पडले आहेत. त्यात महाराष्ट्रातील ४०४  नागरिकांचा समावेश असून, यापैकी ‘रिचा टूर्स प्रा. लि.’ या संस्थेमार्फत प्रवासासाठी गेलेल्या ६० नागरिकांशी कोणताही संपर्क झालेला नाही. याशिवाय, अन्य सहा नागरिकांची माहिती वेब-आधारित लिंकद्वारे प्राप्त झाली असून,         
 
त्यांच्याशीही संपर्क साधता आलेला नाही. दरम्यान, नागपूरमधील १०५ नागरिक भारतात परतले आहेत.तसेच ३७ नागरिक सागा, मानसरोवर येथून भारताच्या दिशेने रवाना झाले असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.

परराष्ट्र मंत्रालयाशी समन्वय

महाराष्ट्राच्या राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून अडकलेल्या नागरिकांची माहिती संकलित करण्यासाठी वेब-आधारित लिंक विकसित केली आहे. ही लिंक सर्व जिल्ह्यांना पाठविण्यात आली असून प्राप्त माहिती केंद्राकडून संकलित केली जात आहे.तसेच, अडकलेल्या नागरिकांची अद्ययावत यादी परराष्ट्र मंत्रालयाच्या नियंत्रण कक्षाला नियमितपणे पाठविण्यात येत आहे. या नियंत्रण कक्षाच्या माहितीनुसार आवश्यक बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली असून हरवलेल्या नागरिकांचा शोध सुरू आहे.
 
नेपाळमध्ये अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना माहिती मिळावी, यासाठी राज्य सरकारने  मदत कक्ष स्थापन केला आहे. नागरिकांनी अधिक माहितीसाठी  ९३२१५८७१४३, ८६५७११२३३३, ९१६७११२११३, १०७० आणि ०२२-२२०२७९९० या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा प्रशासनामार्फत नागरिकांची माहिती पडताळण्याचे काम सुरू असून प्रवासी संस्था आणि कुटुंबीयांशी हेल्पलाइनद्वारे सातत्याने संपर्क ठेवला जात असल्याची माहिती विभागाने दिली आहे.
 
कैलास मानसरोवर यात्रेनंतर परतत असताना केरुंग (ग्यिरोंग) येथे अडकलेले महाराष्ट्रातील  स्मिता प्रदीप पवार, योगिनी पाटील, दिनेश भोसले आणि पूजा भोसले हे चारही भाविक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांमुळे सुखरूप काठमांडू येथे पोहोचले आहेत. तेथून ते काल विमानाने मुंबईत पोहचले. वेळीच मदत आणि सुरक्षित परतीची व्यवस्था केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

आणखी १४९ नागरिकांची यादी

परराष्ट्र मंत्रालयाकडून चीन-तिबेट प्रदेशात असलेल्या भारतातील १४९ नागरिकांची यादी राज्याला प्राप्त झाली आहे. या यादीतील नागरिक महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील असल्याने संबंधित जिल्ह्यांच्या माध्यमातून त्यांची माहिती घेण्याचे आणि पडताळणीचे काम वेगाने सुरू असल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्पष्ट केले आहे.

Related Articles