घोडेगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराचा बोजवारा   

सीसीटीव्ही धूळखात, पाण्याच्या पाईपला गळती, रस्त्यांवर कचर्‍याचे साम्राज्य  

भीमाशंकर, (वार्ताहर) : घोडेगाव ग्रामपंचायत हद्दीत सध्या नागरी समस्यांचा डोंगर साचला असून, स्थानिक प्रशासनाच्या ढिम्म कारभारामुळे नागरिक कमालीचे त्रस्त झाले आहेत. पाण्याच्या पाईपला गळती लागली आहे. सुरक्षेसाठी बसवलेले लाखो रूपयांचे सीसीटीव्ही कॅमेेरे देखभालीअभावी बंद पडले आहेत. तर पथदिवे बंद असल्याने अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. त्यातच कचर्‍याच्या ढिगांमुळे आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. या गंभीर बाबीकडे ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक आणि पदाधिकारी डोळेझाक करत असल्याने ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
 
घोडेगाव ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील मुख्य चौक, संवेदनशील परिसर आणि बाजारपेठेत नागरिकांच्या सुरक्षेसाठी तसेच गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी लाखो रूपये खर्चुन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. मात्र योग्य देखभाल आणि दुरूस्ती न केल्याने हे कॅमेरे गेल्या अनेक महिन्यांपासून बंद अवस्थेत आहेत. त्यामुळे गावात एखादी अघटित घटना घडल्यास अथवा चोरी झाल्यास तपास कसा करायचा, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे गुन्हेगारांचे धाडस वाढले असून, नागरिक भीतीखाली वावरत आहेत. दुसरीकडे मुख्य रस्त्यांसह बहुतेक गल्लीबोळांतील रस्त्यांवरील पथदिवे फ्युज झाले आहेत. ते बदलण्याची तसदीही ग्रामपंचायत प्रशासनाने घेतलेली नसल्याने अंधारात महिला आणि लहान मुलांना अंधारातून ये-जा करताना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 
राष्ट्रीय व राज्य महामार्ग लगत व गावातील रस्त्यांच्या कडेला मोकळ्या जागांवर कचर्‍याचे मोठे ढीग साचले आहेत. नियमित कचरा उचलला जात नसल्याने घाणीचे साम्राज्य पसरले असून, दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. या कचर्‍यामध्ये मोकाट कुत्र्यांचा वावर वाढला असून, डासांची पैदास मोठया प्रमाणात होत आहे. तसेच बहुतेक ठिकाणी ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या पाईपची गळती असल्याने ते पाणी परिसरातील रस्त्यांवर येत आहे. आदी मुलभूत समस्यांबाबत नागरिकांनी वारंवार तोंडी तक्रारी करूनही ग्रामपंचायतीचे प्रभारी ग्रामसेवक, पदाधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
 
घोडेगाव ग्रामपंचायतीने येत्या काही दिवसांत बंद असलेले सीसीटीव्ही कॅमरे पूर्ववत सुरू न झाल्यास, पथदिव्यांची व पाण्याची पाईप लाईन दुरूस्त न केल्यास आणि कचर्‍याची योग्य विल्हेवाट न लावल्यास ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आंबेगाव तालुका अध्यक्ष संतोष बोर्‍हाडे यांनी दिला आहे.
 

Related Articles