पुण्यात १४ दिवस प्रतिबंधात्मक आदेश   

पुणे : शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पुणे पोलिसांनी १ सप्टेंबर ते १४ सप्टेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. हा आदेश महाराष्ट्र पोलिस कयदा, १९५१ च्या कलमानुसार जारी करण्यात आला असून १४ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत लागू असणार आहे. 
 
विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना शहरात वेळोवेळी मोर्च, निदर्शने, बंद आणि आंदोलने करीत असतात. याशिवाय अतिक्रमणविरोधी कारवाई आणि इतर संवेदनशील विषयांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. दहीहांडी, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता, सुरक्षा आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. या आदेशानुसार, कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक ठिकाणी ज्वलनशील, स्फोटक आणि ज्वालाग्राही पदार्थ, दगड, शस्त्रे आणि केनालाही शारीरिक इजा पोहोचवू शकतील अशा इतर कोणत्याही वस्तू जवळ बाळगण्यास परवानगी दिली जाणार नाही. 
 
या व्यतिरिक्त कोणताही व्यक्ती नेता किंवा संस्थेचे पोर्टे्रट, प्रतिकात्मक पुतळे किंवा मुर्ती प्रदर्शित करण्यास किंवा जाळल्यास मनाई आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी अश्लील, आक्षेपार्ह किंवा चिथावणीखोर घोषणा देणे, चिथावणीखोर गाणी गाणे, सामाजिक सलोखा किंवा कायदा व सुव्यवस्थेत व्यत्यय आणू शकणार्‍या कृतींनाही सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास कडक कारवाई करण्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

Related Articles