मटण-चिकन विक्रेत्यांना स्वच्छता आणि अन्नसुरक्षेचे धडे   

पुणे : ग्राहकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार मटण व चिकन उपलब्ध व्हावे, या उद्देशाने शहरातील मांसविक्रेत्यांसाठी विशेष मार्गदर्शन कार्यशाळा घेण्यात आली. ‘सुरक्षित अन्न, सुरक्षित औषध, सुरक्षित महाराष्ट्र’ या अभियानाचा भाग म्हणून आयोजित उपक्रमाला परिसरातील सुमारे २०० अन्न व्यावसायिकांनी प्रतिसाद दिला.
 
अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न व औषध प्रशासनाच्या पुणे विभागाने लक्ष्मीबाजार प्रतिष्ठान ट्रस्टच्या सहकार्याने या कार्यशाळेचे आयोजन केले होते. भवानी पेठेतील लक्ष्मीबाजार सांस्कृतिक भवनात हा कार्यक्रम पार पडला.मटण व चिकनची विक्री करताना आवश्यक असलेली स्वच्छता, अन्नपदार्थांची सुरक्षित हाताळणी तसेच विक्रीच्या ठिकाणी पाळावयाच्या आरोग्यविषयक नियमांची माहिती उपस्थित व्यावसायिकांना देण्यात आली. विक्रेते आणि कर्मचार्‍यांची वैयक्तिक स्वच्छता, दुकान व आजूबाजूच्या परिसराची नियमित साफसफाई, कच्च्या व तयार खाद्यपदार्थांची स्वतंत्र आणि योग्य पद्धतीने साठवणूक यांसह विविध मुद्द्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.
 
मांसाच्या गुणवत्तेसाठी आवश्यक तापमान कायम राखणे, स्वच्छ पाण्याचा वापर करणे, उपकरणांचे निर्जंतुकीकरण, कचर्‍याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट आणि कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांचीही सविस्तर माहिती देण्यात आली.
 
अन्नसुरक्षा व मानके अधिनियम, २००६ तसेच त्याअंतर्गत लागू असलेल्या नियम आणि विनियमांचे प्रत्येक अन्न व्यावसायिकाने काटेकोर पालन करणे आवश्यक असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले. व्यवसायाच्या ठिकाणी निर्धारित स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या मानकांची अंमलबजावणी करून ग्राहकांना गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ देण्याचे आवाहनही करण्यात आले.कार्यशाळेत सहआयुक्त (अन्न) दिगांबर भोगावडे, सहाय्यक आयुक्त नारायण सरकटे आणि अन्न सुरक्षा अधिकारी सतीश हाके यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यांनी अन्नसुरक्षेशी संबंधित आवश्यक उपाययोजनांसह कायद्यातील महत्त्वाच्या तरतुदींची माहिती दिली.

टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन

स्वच्छता आणि अन्नसुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष करणार्‍या व्यावसायिकांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला. अन्नपदार्थांचा दर्जा किंवा विक्रीच्या ठिकाणच्या अस्वच्छतेबाबत तक्रार असल्यास नागरिकांनी प्रशासनाच्या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहनही करण्यात आले.
 

Related Articles