केसरीवाडा गणेश मूर्तीच्या प्रतिकृतीची जर्मनीत होणार प्रतिष्ठापना   

पुणे : भारतीय स्वातंत्र्य संग्रामाचे थोर सेनानी व सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळक यांनी सुरू केलेल्या केसरी गणेशोत्सवातील गणेश मूर्तीच्या प्रतिकृतीची जर्मनीत प्रतिष्ठापना होणार आहे. जर्मनीतील म्युनिक येथील महाराष्ट्र मंडळाने गणेशोत्सवाचे आयोजन केले आहे. 
 
येत्या १४ सप्टेंबर रोजी म्युनिक येथे गणेशोत्सवाला सुरूवात होणार आहे. तेथील महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष केदार जाधव यांच्याकडे ही गणेशमूर्ती शुक्रवारी सुपुर्द करण्यात आली. हा कार्यक्रम केसरीवाड्यातील गणेश मंदिरात पार पडला. मागील काही वर्षांपासून जर्मनीतील विविध शहरांत गणेशोत्सव साजरा केला जात आहे. मागील वर्षी जर्मनीतील फ्रँकफर्ट येथे लोकमान्य टिळकांचे खापर पणतू डॉ. रोहित टिळक यांच्या हस्ते गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. 
 
यंदा म्युनिक येथे होणार्‍या गणेशोत्सवात जर्मनीतील विविध शहरांत वास्तव्याला असलेले भारतीय नागरिक सहभागी होणार आहेत. केसरीवाडा गणेश मूर्तीची प्रतिकृती हे यंदाच्या उत्सवाचे आकर्षण असणार असल्याचे महाराष्ट्र मंडळाचे अध्यक्ष केदार जाधव यांनी सांगितले. मूर्ती सुपूर्द करताना  मूर्तीकार मंदार रायरीकर, मंदार देशमुख, ‘केसरी’चे वृत्तसंपादक स्वप्निल पोरे, मुख्य वार्ताहर विजय चव्हाण, पर्सोनेल विभागाचे अधिकारी सुरज भोंडेकर,  वितरण विभाग अधिकारी विक्रांत गुजर, संजय गांधी निराधार योजनेच्या कसबा मतदार संघाचे माजी अध्यक्ष प्रवीण करपे आदी उपस्थित होते. 
 

Related Articles