टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिवस उत्साहात   

पुणे : टिळक महाराष्ट्र विद्यापीठात राष्ट्रीय क्रीडा दिवस विविध क्रीडा उपक्रमांच्या माध्यमातून उत्साहात साजरा करण्यात आला. भारताचे महान हॉकीपटू आणि ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी २९ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा केला जातो.विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचार्‍यांमध्ये शारीरिक तंदुरुस्ती, क्रीडा संस्कृती, आरोग्यदायी जीवनशैली, संघभावना आणि खेळाडूवृत्ती वाढविणे हा या कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश होता. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. गीताली टिळक यांनी मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन केले. विद्यापीठाचे सचिव अजित खाडीलकर यांच्यासह राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक तृष्णाल सुर्वे आणि योगेश येनपुरे उपस्थित होते.
 
क्रीडा विभागाचे चेअरमन पवनकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा उपक्रम, व्यायाम सत्रे आणि क्रीडा जनजागृतीपर प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी विद्यापीठात विविध उपक्रम राबविले जात आहेत. गुणवंत खेळाडूंना आवश्यक सुविधा व मार्गदर्शन उपलब्ध करून देत विद्यापीठातील क्रीडा संस्कृती अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
 
राष्ट्रीय क्रीडा दिवसाच्या आयोजनासाठी क्रीडा विभाग, प्रशिक्षक, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले. ‘खेळा, तंदुरुस्त राहा आणि निरोगी भारत घडवा!’ या संदेशाने कार्यक्रमाची सांगता झाली. 
 

Related Articles