भारताची दक्षिण कोरियाविरुद्ध सलामीची लढत   

महिला ज्युनियर आशिया कप हॉकी

नवी दिल्ली:  मिडफील्डर खैदेम शिलेमा चानूच्या नेतृत्वाखालील भारतीय महिला हॉकी संघ ४ ते १३ सप्टेंबरदरम्यान चीनमधील मोकी येथे होणार्‍या एएचएफ महिला ज्युनियर आशिया कपमध्ये दक्षिण कोरियाविरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करणार आहे.
 
नवनियुक्त प्रशिक्षक टिम व्हाइट यांच्या मार्गदर्शनाखाली १८ सदस्यीय भारतीय संघाने स्पर्धेसाठी चांगली तयारी केली आहे. यासाठी भारतीय संघाने यंदा ब्रिटनचाही दौरा केला होता. भारताला या स्पर्धेत यजमान चीन, जपान, दक्षिण कोरिया आणि मलेशियासह एलीट पूलमध्ये स्थान देण्यात आले आहे.
 
व्हाइट यांनी सांगितले की, बंगळुरूमध्ये संघाची चांगली तयारी झाली असून, आशिया कपमध्ये संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. ‘‘आशिया कपमध्ये खेळण्यासाठी संघ उत्सुक आहे. आमची तयारी चांगली झाली असून, भारत ‘अ’ संघाविरुद्धचे चार सामनेही त्यात महत्त्वाचे ठरले. आम्हाला आमच्या रणनीतीवर पूर्ण विश्वास आहे. आशियातील सर्वोत्तम संघांविरुद्ध ती आजमावण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत,’’ असे व्हाइट म्हणाले. दक्षिण कोरियाविरुद्धच्या सामन्यानंतर भारत ६ सप्टेंबरला मलेशिया, ८ सप्टेंबरला जपान आणि ९ सप्टेंबरला यजमान चीनविरुद्ध खेळणार आहे.
 

Related Articles