महाराष्ट्रातून ऑलिम्पिक सुवर्णविजेता घडविण्याचे लक्ष्य : मुरलीधर मोहोळ   

पुणे : महाराष्ट्राच्या मातीत क्रीडा प्रतिभेची कमतरता नाही. या प्रतिभेला योग्य प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि संधी मिळाल्यास महाराष्ट्रातून ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता घडू शकतो. त्यासाठी ५ ते १५ वयोगटातील मुलांमधील क्रीडा गुण हेरून त्यांना लहान वयातच प्रशिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री आणि महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी केले.
 
राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त भारतीय डाक विभागाच्या महाराष्ट्र-गोवा परिमंडळ आणि पुणे विभागातर्फे डेक्कन जिमखाना येथे आयोजित कार्यक्रमात २०२६च्या ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या संकल्पनेवर आधारित विशेष आवरणाचे प्रकाशन मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिसपटू पूजा कोपरकर, आश्लेषा बोडस, जलतरणातील छत्रपती पुरस्कारविजेते प्रशिक्षक मनोज एरंडे तसेच डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी देशासाठी क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या पोस्टातील खेळाडू-कर्मचार्‍यांचा मनाली जाधव, सोनाली तोडकर, ओंकार मोकाशी, अभिषेक मोरे, अंजली कपूर आणि निकित धुमाळ यांचा मोहोळ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
 
अधिकाधिक क्रीडा प्रकारांत भारताची उपस्थिती हवीऑलिम्पिकमध्ये भारताचा सहभाग आणि पदकांची संख्या वाढवायची असेल, तर अधिकाधिक क्रीडा प्रकारांमध्ये आपली उपस्थिती मजबूत करावी लागेल. पारंपरिक तसेच अन्य क्रीडा प्रकारांना प्रोत्साहन देतानाच आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. प्रतिभावान खेळाडू शोधून त्यांना योग्य प्रशिक्षण दिल्यास भारताच्या ऑलिम्पिक कामगिरीत मोठी झेप घेता येईल, असे मोहोळ म्हणाले.
 
२०३६ मध्ये भारतात ऑलिम्पिक आयोजनाचे स्वप्न आहे. त्यामुळे पुढील पिढीतील खेळाडू घडविण्याचे काम आतापासूनच सुरू करणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातून देशाला ऑलिम्पिकचे वैयक्तिक सुवर्णपदक मिळवून देणारा खेळाडू घडविणे हे आपले लक्ष्य असले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.ऑलिम्पिक पदकामागे केवळ सरकारची भूमिका नसून खेळाडूंची मेहनत, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, पालकांचे कष्ट आणि कुटुंबाचे पाठबळ महत्त्वाचे असते. सरकारनेही सकारात्मक धोरणे आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून खेळाडूंच्या पाठीशी उभे राहावे, असे मोहोळ यांनी सांगितले.

विशेष आवरणातून राष्ट्रकुल स्पर्धेचा गौरव

भारतीय डाक विभागाने २०२६च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या विषयावर विशेष आवरण प्रकाशित करून या महत्त्वपूर्ण स्पर्धेचा गौरव केला. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या कार्यक्रमाला क्रीडा आणि टपाल क्षेत्राच्या संगमाचे विशेष महत्त्व प्राप्त झाले.
 

Related Articles