श्रावण आला   

येते मनात काही : प्रतिभा कणेकर 

‘हासरा,नाचरा,जरासा लाजरा, सुंदर साजिरा श्रावण आला’हे शब्द कुठूनसे कानावर आले आणि मन नकळत मोहरून गेले. कालपर्यंत मी म्हणत होते, ‘आला श्रावण’. आता मनात शब्द उमटले, ‘श्रा...व...ण आला!’ 
 
शोभादर्शकात रंगबिरंगी काचांचे आकार उमटावेत तसे मनात साठलेल्या आठवणींचे झाले. आधी आठवले मेंदीने रंगलेले इवले इवले हात. गवती बंगल्यातली मेंदीची झाडं पानांनी गच्च झालीत असं निर्मलाने सांगितलं की, खरे श्रावणाचे वेध लागायचे. मग शाळा सुटल्यावर एक दिवस ‘गवती बंगल्या’त मेंदी तोडायला जाण्याचा ठरायचा. त्या दूरच्या बंगल्यावर जाताना, एक मोठे माळरान आणि त्यापुढे शेतांच्या मधली पायवाट लागायची. ‘नीट जा ग. वारुळांवर पाय पडू देऊ नका. तिन्हीसांजेच्या आत परत या’ या आईच्या सूचनांवर माना डोलवत, तोंडात रावळगावची गोळी चघळत अन हातातली पिशवी उडवत, धावत ते मैल-दीडमैलाचे अंतर ‘अस्से’ ओलांडले जायचे! वाटेत ‘चल ग सये वारुळाला वारुळाला’ किंवा ‘दिवस सुगीचे सुरू जाहले’ अशा कवितांचे समूहगान असायचे. मेंदीच्या पानांनी पिशवी भरत आली की एकमेकींना, ‘ए, चला ग लवकर.’, ‘हो ग. बास की आता’, ‘हो बाई!’ च्या चिवचिवाटात तिन्हीसांजा व्हायच्याच. लाल, पिवळसर, केशरी रंगांच्या ढगांतून सूर्य मावळताना सगळं वातावरण सोनेरी व्हायचं. तशा आम्ही आपापल्या पिशव्या उराशी धरून पळत सुटायचो. कुणीतरी कानात गुपित सांगे, ‘चिमणीची शी घाल वाटताना, मेंदी जास्त रंगते, आईशप्पथ!’. दुसर्‍या दिवशी एकमेकींचे लाललाल हात न्याहाळण्यात दिवस जायचा. 
 
मेंदीभरल्या हातांनी पाटावर गंधांचे नऊ नाग, नऊ नागिणी आणि नऊ पिल्ले रेखाटताना आईला विचारले होते, ‘नऊच का ग?’. ‘ते नऊ नागवंश असतात’. नंतर कधीतरी संख्या-संकेत कोशातून समजले की अनंत, वासुकी, शेष, तक्षक, कालिया, कंबल, पद्मनाभ, शंखपाल आणि धृतराष्ट्र, ही ती नऊ नागकुळे! आणि नाग ही बुद्धीची देवता आहे. योगसूत्राचे निर्माते पतंजली हे शेषनागाचे अवतार मानले जातात. तामिळनाडूत त्यांची अर्धमानव अर्धशेषरूपातील मूर्ती असल्याचे व ती कुंडलिनीस्वरूप असल्याचे वाचनात आले. कालौघात आपल्या कृषिप्रधान संस्कृतीने नागकथेचे आपल्याला अनुरूप असे स्वीकरण केले. श्रावणात वारुळातून साप बाहेर पडतात. शेतात काम करणार्‍या आपल्या भावाला, पतीला त्यांनी दंश करु नये म्हणून शेतकरी स्त्रीने नागपूजन करायला सुरुवात केली. शेतीच्या कामातून किंचित फुरसद मिळाल्यावर सासुरवाशिणींना माहेरी आणण्याची एक प्रथा सुरू झाली. पूर्वी, कोर्‍य लुगड्यांचा बोंगा सांभाळत, किणकिणणार्‍या बांगड्यांच्या हातांनी एका हातात पिशवी अन कडेवर नव्या अंगड्या-टोपड्यातलं लेकरु घेऊन बस पकडायला धावणार्‍या कोवळ्या माहेरवाशिणी हे नागपंचमीच्या दुसर्‍या दिवशीचं दृश्य असायचं.  
 
श्रावण...व्रतवैकल्यांचा महिना. श्रावणातले सोमवार शंकरपूजेचे, मंगळागौर देवीपूजन, शुक्रवारची जीवती, शनिवारी मारुतीपूजन. शिवाय शितळासप्तमी, गोकुळाष्टमी, नारळीपौर्णिमा दिनविशेषांचीही मोठी रेलचेल. साठ वर्षांपूर्वी श्रावणी सोमवारला अर्धाच दिवस शाळा असे. सरकारी कार्यालयांनासुद्धा अर्धा दिवस सुट्टी असे. मग संध्याकाळी सूर्यास्तापूर्वी सर्व कुटुंबाची एकत्र पानं वाढली जात. अमुक देवाला अमुक ‘आवडतं’ किंवा ‘लागतं’ च्या निमित्ताने खाद्यसंस्कृतीला केवढा बहर येतो श्रावणात! सोमवारी मुगाचे किंवा वालाचे बिर्‍हडे, मंगळागौरीला मटकीची उसळ आणि पुरणपोळी, नागपंचमीला उकडीचे पदार्थ, शितळासप्तमीला सांदणं, गोकुळाष्टमीला नारळाचा चव भरलेली राजेळी केळी, शुक्रवारी गोडाच्या आरत्या, शनिवारी रोडगे आणि हो, नारळी पौर्णिमेला नारळीभात. देशावर गहू आणि डाळीचे गोड पदार्थ तर कोकणात तांदूळ आणि नारळाचे गोड प्रकार! मे महिन्यात घातलेलं लोणचं सटात निघायचं. पावसाळी हवेत अळूवडीचा खमंग वास घमघमत राहायचा. कहाण्यांची हाताळून जीर्ण झालेली पुस्तके श्रावणात बाहेर निघायची. दिवसभराच्या कामकाजातून मोकळं झाल्यावर संध्याकाळी, कुटुंबाने एकत्र बसून आळीपाळीने मुलांना कहाणी वाचायला बसवले जायचे. एक आटपाट नगर होते.. ने सुरु होणारी प्रत्येक कहाणी ही ‘साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संप्रूण’ (संपूर्ण नव्हे, संप्रूण) व्हायची. एक राजा व त्याच्या  आवडत्या-नावडत्या राण्या किंवा गरीब ब्राह्मण, शेतकरी व त्याच्या सुना. यांत कुणीतरी सुशील, कुणीतरी व्रात्य. सगळंच अतिशयोक्तीपूर्ण अन सगळंच अद्भुत! ‘खुलभर दुधाची सोमवारची कहाणी’ आणि ‘बहिणीला पानावरून उठवणार्‍या भावाची शुक्रवारची कहाणी’ या मला आवडायच्या. बाकी गोष्टी  कधी खर्‍या वाटल्या नाहीत पण  कहाण्यांची लयदार भाषा भारी आकर्षक वाटायची. आटपाट नगर होतं. तिथं एक राजा होता. राजाला चार सुना होत्या. तीन आवडत्या. एक नावडती. नावडतीला जेवायला उष्टं. नेसायला जाडंभरडं. राहायला गुरांचं बेडं. गुराख्याचं काम दिलं. पुढं श्रावणमास आला. पहिला सोमवार आला. ती रानी गेली... लहान लहान वाक्यांतून ऐकणार्‍याची उत्सुकता वाढवली जाई. कुणी रचल्या असतील या कहाण्या? कोणता काळ असेल? कधीचे लोकमानस असेल हे? 
 
वसईला संध्याकाळची आमच्याकडे फुलांची टोपली घेऊन ‘पाली’ ची काकी यायची. वसई म्हणजे फुलांचं माहेरघर. टवटवीत गुलाबी गावठी गुलाब, मरवा, पाचू, जाई-जुई, मदनबाण, सायलीचे गजरे, सोनचाफा, कवठीचाफ्याची फुलं! वाडीतल्या सोनटक्क्याच्या फुलांच्या केळीच्या सोपाने बांधलेल्या जुड्या अन सोपातच ओवलेले बकुळीचे वळेसर! काकीने टोपलीवरचे केळीचे पान दूर केले की, रंग-गंधांची उधळण व्हायची. एखाद्या बिदीत कदंबाचं झाड असायचं, केवड्याचं रान असायचं. शुक्रवारच्या बाजारात, एखादी आदिवासी मुलगी कदंबाचे तांबुस सोनेरी सपर्ण गेंद आणि केवड्याचं कणीस घेऊन दिसायची. आमच्या दारी पारिजातकाचा सडा पडायचा. लालचुटुक जास्वंद फुलायची. श्रावणात अवघं वातावरण असं सुगंधानं दरवळून जायचं.  आमच्या बैठ्या घराच्या बाजूच्या तळ्यात जांभळट रंगाची, लहानुली कमळं उमलायची. संध्याकाळी बेडकांचे ‘डराँव ड्रांव डराँव ड्राँव’ चे गाणे चालायचे. एखादं वाट चुकलेलं बेडकाचं पिलू टणाटण उड्या मारत घरात शिरलं की, मुलांची नुसती पळापळ व्हायची. बेडकाची पिल्लं पत्करली पण जास्वंदीच्या खिडकीलगतच्या फांदीवरून घरात शिरलेल्या सुरवंटांपासून फारच सावध राहावे लागायचे. मात्र पूर्ण बगीचा सूर्यांची किरणे पडली की हिरव्या रंगच्छटांनी लखलखायचा अगदी. रस्त्याने जाताना, जुन्या पडक्या घरांच्या भिंतीदेखील हिरवी मखमल पांघरल्यासारख्या  मनमोहक दिसायच्या. 
 
खरंच श्रावण किती आनंदाचं देणं घेऊन येतो! दुर्गाबाई भागवतांच्या ‘श्रावण-साखळी’ या ललितलेखातून आणि बालकवींच्या ‘श्रावणमासी’ तून श्रावणाचे सौंदर्य मराठी वाचकाने अनुभवले आहेच. शिवाय अनेक कवींनी श्रावणाची कितीकिती आरस्पानी रूपे टिपली आहेत!! कुसुमाग्रजांना ‘भिजल्या मातीत तांबूस कोमल पावले टाकत, मेघात सोनेरी निशाणे लावत, हिरव्या रानात केशर शिंपत, इंद्रधनुष्याच्या कमानी बांधत येणारा हसरा, नाचरा, लाजरा’ श्रावण दिसला. सदानंद रेग्यांचा श्रावण ‘रंगांचे गुच्छ आणि ऊन-पावसाचे पक्षी ओंजळीत घेऊन सोनपावलांनी येताना गोठलेल्या आसवांना नवीन पंख घेऊन येणारा’ आहे. डोंगरांतून वाहणारे झरे, धबधबे हे तर श्रावणाचे नयनसुख. बोरकरांनी त्यांचे वर्णन करताना म्हटले, ‘गिरिदरीतुनी झरे, नव्हे हे हिरे उसळती निळे’ तर शांताबाई शेळक्यांनी ‘कभिन्न काळ्या खडकांमधुनी फुटती दुधाचे झरे’ असे त्यांचे वर्णन केले आणि वसंत सावंतांना तर ‘सह्याद्रीला कुणी फाशिले भस्म नवे शैवांनी’ अशी कल्पना सुचली. श्रावणाचे आगमन शांताबाईंना वेळुबनातील वार्‍याच्या पावरीतून आणि रानपाखरांच्या शिळांमधून जाणवते, इंदिराबाईंना तो नाद ‘वार्‍याच्या पैंजणाचा’ वाटतो. झाडी बोलीतल्या लोकराम शेंडे या कवीने रानावनातले त्याचे वेगळेच रूप अनुभवले आहे. ‘सरावन मईन्यात ढगा ढोल वाजवती / कारजात धाकधुक ईजा किल्लोर करती’. उगाच नाही वसंत सावंतांना तो ‘नभाच्या पल्याड उभा असलेला श्रीरंग’ वाटला. ऐश्वर्य पाटेकरांना तो रंगांची उधळण करणारा रंगारी, दरी-डोंगरात नाचणारा, नदीशी झिम्मा खेळणारा ‘खेळगा’ वाटतो आणि पावसाचं घर उन्हात बांधणारा खट्याळही वाटतो. 
 
मंगेश पाडगावकरांच्या ‘श्रावणात घननिळा..’ बद्दल मी नाही बोलणार पण त्यांनी ‘पार्थिवतेचा जयजयकार’ ही कविता श्रावणातला निसर्ग अनुभवतानाच लिहिली असावी निश्चित. पार्थिवतेत त्यांना ब्रह्मसाक्षात्कार होतो. म्हणून ते लिहितात, ‘जय जय हे वृक्षातिल, पक्ष्यातिल पार्थिवते, मातीतिल मूर्तितिल पार्थिवते / जय जय रंग-गंध-नादमयी, जय जय आकारमयी जय जय तारुण्यमयी, जयजय कारुण्यमयी / ब्रह्म तुझ्या गर्भातच वाढतसे विकसतसे विकसतसे!’ 

Related Articles