झेलेन्स्कींचे सहकारी ते प्रतिस्पर्धी!   

चर्चेतील चेहरे : राहुल गोखले 

रशियाच्या आक्रमणाच्या आधी २०१९ मध्ये युक्रेनमध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी दणदणीत बहुमत मिळवत सत्ता स्थापन केली होती. त्यांच्या विजयात मोठा वाटा त्यांचे प्रचारतंत्र संभाळणारे मिखाइलो फेदोरॉव यांचा होता. किंबहुना आपल्या प्रचाराची समाजमाध्यमीय व्यूहरचना आखण्यासाठीच झेलेन्स्की यांनी त्यांना खास पाचारण केले होते; तेंव्हा या दोघांत परस्परविश्वासाची भावना असणे साहजिक होते. मात्र, त्याच फेदोरॉव यांना झेलेन्स्की यांनी अलीकडेच मंत्रिमंडळातून डच्चू दिला. त्यामुळे हे एकेकाळचे स्नेही आता एकमेकांचे राजकीय प्रतिस्पर्धी बनले आहेत एवढेच नव्हे तर फेदोरॉव यांनी युक्रेनमध्ये निवडणुका घेण्याचे आव्हान दिले आहे. तरुणांच्या आंदोलनांची चर्चा सध्या सर्वत्र होत असून, फेदोरॉव जरी अगदीच तरुण पिढीच्या वयोगटातील नसले तरी ते तरुणच आहेत यात शंका नाही. या राजकीय आव्हानाला झेलेन्स्की आता कसे तोंड देतात आणि फेदोरॉव आपली पुढील राजकीय वाटचाल कशी आखतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
 
फेदोरॉव यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी लाभलेली नाही. ते विपणनशास्त्रातील (मार्केटिंग) तज्ज्ञ मानले जातात; पण राजकीय प्रचाराला आता तसेच स्वरूप आल्यामुळे त्यांची निवड झेलेन्स्की यांनी आपल्या प्रचाराची आघाडी सांभाळण्यासाठी केली होती. २१ जानेवारी १९९१ रोजी दक्षिण युक्रेनच्या झापोरोझिया प्रांतातील वासिलिव्का येथे त्यांचा जन्म झाला, तर त्यांचे बालपण झापोरोझिया शहरात व्यतीत झाले. उल्लेखनीय भाग म्हणजे, फेदोरॉव यांचे जन्मगाव आता रशियाच्या ताब्यात आहे, तर ज्या शहरात त्यांनी आपले बालपण घालवले, ते शहर युक्रेनच्याच ताब्यात असले तरी रशियाचे ड्रोन व बॉम्ब यांच्या सततच्या हल्ल्यांचे लक्ष्य ठरले आहे. झापोरोझिया  विद्यापीठातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. फेदोरॉव यांचा राजकारणाशी संबंध २०१४ मध्ये आला, जेव्हा प्रतिनिधीगृहाच्या निवडणुकीत त्यांनी नशीब आजमावले होते. तथापि त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. २०१९ मध्ये मात्र त्यांची निवड झेलेन्स्की यांनी आपल्या प्रचार चमूमध्ये केली आणि फेदोरॉव यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली. 
 
झेलेन्स्की यांनी निवडणुकीत बाजी मारली आणि फेदोरॉव यांनाही प्रतिनिधीगृहात स्थान मिळाले आणि पुढे त्यांनी उपपंतप्रधानपदापर्यंत मजल मारली. २०२३मध्ये फेदोरॉव यांच्या अधिकारांमध्ये आणखी वाढ झाली. त्यातच यावर्षीच्या प्रारंभी झेलेन्स्की यांनी फेदोरॉव यांची देशाचे संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली. कोणत्याही देशाचे संरक्षण पद हे कळीचे असते; त्यातही युद्धकाळात या पदाची जबाबदारी पणाला लागलेली असते. वयाच्या अवघ्या पस्तिशीत फेदोरॉव या पदाला न्याय देऊ शकतील का, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक होते; याचे एक कारण युक्रेनच्या इतिहासातील ते सर्वांत तरुण संरक्षण मंत्री असणे हे तर होतेच; पण माहिती तंत्रज्ञान हा त्यांच्या तज्ज्ञतेचा प्रांत असला तरी संरक्षण क्षेत्राचा त्यांना प्रत्यक्ष अनुभव नव्हता हेही महत्त्वाचे कारण होते. त्यामुळे रशियाच्या हल्ल्यांविरोधात युक्रेनच्या संरक्षणाची जबाबदारी समर्थपणे पार पाडणे ही फेदोरॉव यांच्यासाठी एक कसोटी होती. तथापि, फेदोरॉव यांनी आपल्या कामगिरीने त्या शंकांना चोख उत्तर दिले.मंत्रिमंडळात सामील झाल्यापासूनच त्यांनी एक कार्यकुशल मंत्री असा लौकिक मिळविला होता. डिजिटल परिवर्तन हे त्यांनी आपल्या विभागाचे प्रमुख उद्दिष्ट ठरविले. त्यासाठी ’डिआ’ नावाचे मोबाईल अ‍ॅप विकसित केले, ज्याचा शाब्दिक अर्थ ’कृती’ असा होतो. या अ‍ॅपद्वारे युक्रेनमधील नागरिकांना वाहनांच्या नोंदणीपासून विवाह आणि घटस्फोटापर्यंतची सरकारी कामे ऑनलाईन करणे शक्य झाले. परिणामतः नागरिकांचा वेळ वाचलाच; पण सोयही झाली. सरकारी कामांचे शंभर टक्के डिजिटलायझेशन करण्याचे त्यांचे उद्दिष्ट साध्य झाले नसले तरी, त्यांच्या विभागाने डिजिटल व्यवहारांच्या माध्यमातून नागरिकांना दिलासा दिला यात शंका नाही. २०२२ मध्ये रशियाने युक्रेनवर आक्रमण केल्ले, तेव्हा संरक्षण खात्याचे मंत्री नसतानाही फेदोरॉव यांनी स्पेसएक्सचे मालक एलोन मस्क यांना युक्रेनच्या हद्दीत स्टारलिंक इंटरनेट सेवा सक्रिय करण्याचे आवाहन केले होते. मस्क यांनीही त्यास लगोलग प्रतिसाद दिला. युद्धाच्या काळात दळणवळण ही कळीची बाजू असल्याने, या सेवेचा युक्रेनच्या लष्कराला दळणवळणासाठी मोठ्या प्रमाणावर फायदा झाला. रशियाकडून स्टारलिंकचा अनधिकृत वापर होत असल्याचे आढळताच फेदोरॉव व स्टारलिंक यांनी तातडीने पावले उचलून तो वापर थांबविला. यातूनच फेदोरॉव यांची प्रतिमा एक प्रभावी आणि दूरदर्शी मंत्री अशी निर्माण झाली आणि कदाचित त्यांच्या याच कामाच्या झपाट्याची दखल घेत झेलेन्स्की यांनी त्यांस संरक्षण खाते सोपविले असू शकते.
 
पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर फेदोरॉव यांचा भर लष्कराच्या आधुनिकीकरणावर होता. केवळ पारंपरिक पद्धतीने लष्कराने रशियाच्या हल्ल्यांचा प्रतिकार करण्याऐवजी ड्रोनची फौज युक्रेनने उभी करावी असे त्यांचे पक्के मत होते. त्यांच्याकडे हे खाते आल्यानंतर त्यांच्या विभागाने अशी प्रणाली विकसित केली, ज्यामुळे रशियाच्या कोणत्या भागावर युक्रेनने हल्ला चढवायचा याच्या नेमक्या ठिकाणांची ’व्हिडिओ पडताळणी’च्या (व्हेरिफिकेशन) माध्यमातून सैनिकांना माहिती मिळू लागली. युद्धभूमीवरील शक्य तितकी अद्ययावत माहिती गोळा करण्यावर देखील त्यांनी भर दिला. संरक्षण खाते हे केवळ युद्धसामग्रीच्या आधारावर नाही तर ते माहिती-केंद्रित असेल तर सक्षम ठरेल अशी भूमिका त्यांनी मांडली. त्याचा लाभ युक्रेनला झाला. ड्रोन व रोबो तंत्रज्ञानाचा नेमका वापर केल्याने युद्धभूमीवरील युक्रेनची कामगिरी लक्षणीय प्रमाणात सुधारली.
 
परंतु त्याच वेळी त्यांचे लष्करप्रमुख अलेक्झांडर सिरस्की यांच्याशी त्यांचे खटके उडू लागले. याचे मुख्य कारण म्हणजे या दोघांत असणारे पिढीतील अंतर. साठीच्या घरात असलेले सिरस्की यांचा युद्धाविषयीचा दृष्टिकोन सोव्हिएत महासंघाच्या काळात तर पस्तिशीतील फेदोरॉव यांचा दृष्टिकोन एकविसाव्या शतकातील माहिती-तंत्रज्ञानाच्या काळात आकारास आला. फेदोरॉव संरक्षण खात्याला आधुनिक स्वरूप देत असताना युद्धभूमीवर मात्र पारंपरिक पायदळालाच महत्त्व दिले पाहिजे, असे सिरस्की यांचे ठाम मत होते. तथापि, पायदळाच्या वापराने युक्रेनच्या सैनिकांचा बळी जाण्याचे प्रमाण वाढण्याची भीती व्यक्त होत होती. या मतभेदाची परिणती अखेरीस फेदोरॉव यांच्या उचलबांगडीत झाली; त्यानंतर लष्करप्रमुख सिरस्की यांनाही आपले पद गमवावे लागले.
 
वास्त त्यानंतर झेलेन्स्की यांनी फेदोरॉव यांना पुन्हा संरक्षण मंत्रिपदावर नियुक्त करण्याची तयारी दर्शवली होती. पण एकदा हकालपट्टी झाल्यानंतर पुन्हा तेच पद ग्रहण करणे कदाचित फेदोरॉव यांना औचित्याचे वाटले नसावे. तेव्हा त्यांनी त्यास नकार दिला. अर्थात, याचे एक कारण हेही होते की जनतेतून त्यांना मोठा पाठिंबा मिळत होता. फेदोरॉव यांची पुन्हा संरक्षण मंत्रिपदावर नियुक्ती करावी असे स्वर जनतेतून उमटू लागले होते आणि अद्याप ती निदर्शने चालू आहेत. त्यातच झेलेन्स्की यांनी येव्हहेन ख्मारा यांची संरक्षण मंत्रिपदी वर्णी लावल्यानंतर फेदोरॉव यांनी त्यावर टीका केली. तेव्हा झेलेन्स्की यांनी पुन्हा फेदोरॉव यांची अन्य खात्यात मंत्री म्हणून नियुक्ती करण्याच्या हालचाली केल्या, परंतु त्यात त्यांना यश आले नाही. उलट फेदोरॉव यांनी झेलेन्स्की यांच्याविरुद्ध ताठर भूमिका घेतली. त्यांना मिळत असणार्‍या पाठिंब्याचे प्रतिबिंब पाहण्यांमध्येही पडले आहे. फेदोरॉव यांच्या लोकप्रियतेचा आलेख ३५ वरून ६५ टक्क्यांपर्यंत वधारला आहेच; पण पाहणीत भाग घेणार्‍यांपैकी ७२ टक्के जणांंना फेदोरॉव यांची संरक्षण मंत्रिपदावरून झालेली हकालपट्टी रुचलेली नाही असेही दिसते. या वाढत्या लोकप्रियतेचा विचार करून फेदोरॉव यांनी शेवटी आपला हुकुमी पत्ता बाहेर काढला आणि तो म्हणजे झेलेन्स्की यांना आव्हान देण्याचा.
 
एका व्हिडिओ संदेशाद्वारे त्यांनी युक्रेनमध्ये सार्वत्रिक निवडणुका घेण्याची मागणी केली. २०२४ मध्येच युक्रेनमध्ये निवडणुका होणार होत्या; पण युद्धामुळे त्या लांबल्या. आता झेलेन्स्की यांचेच एकेकाळचे कट्टर समर्थक असणारे फेदोरॉव यांनी ती मागणी केल्याने झेलेन्स्की यांच्या अडचणी वाढण्याचा संभव आहे. किंबहुना, त्यातूनच बहुधा झेलेन्स्की यांनी आपल्याला चुकीची माहिती पुरवून अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांच्यासमोर आपल्याला तत्कालीन संरक्षण मंत्री असलेले फेदोरॉव यांनी तोंडघशी पाडले अशी प्रतिक्रिया दिली आहे. फेदोरॉव यांच्या वाढत्या आव्हानाची जाणीव झेलेन्स्की यांना होऊ लागली असल्याचे ते द्योतक मानले पाहिजे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी झेलेन्स्की निवडणुका टाळत असल्याची टीका पूर्वी केली होती आणि आता ट्रम्प यांचा पाठिंबा आपल्याला लाभेल असा फेदोरॉव यांचा होरा असावा. त्यामुळे ते अमेरिकेचा दौरा करण्याचीही शक्यता आहे. युद्धकाळात निवडणुका घेणे कितपत योग्य; त्या घेतल्या तर युक्रेनमध्ये असणार्‍या राजकीय मतभेदांचा लाभ रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन घेतील का, इत्यादी प्रश्न अप्रस्तुत नाहीत. मात्र, कोणत्याही राजनेत्याची सद्दी कधी ना कधी संपतच असते आणि ’युद्ध सुरू आहे’ या सबबीखाली राष्ट्रप्रमुखाला सत्तेत कायम राहता येईलच असेही नाही.
 
युक्रेनमध्ये लगेच निवडणुका होण्याची शक्यता धूसर असली तरी त्या लवकरात लवकर व्हाव्यात म्हणून आता झेलेन्स्की यांच्यावर दबाव वाढेल आणि त्या जेव्हा होतील, तेव्हा फेदोरॉव हेच त्यांचे सर्वात मोठे प्रतिस्पर्धी आणि कदाचित युक्रेनचे पुढील अध्यक्षही असू शकतील. सहाच वर्षांपूर्वी निवडणुकीत झेलेन्स्की यांच्या विजयात मोलाचे योगदान दिलेले मिखाइलो फेदोरॉव हेच त्यांच्या पतनास कारणीभूत ठरले, तर तो एक विचित्र विरोधाभास ठरेल यात शंका नाही.

Related Articles