बळींची संख्या ३६२ वर;अद्याप शेकडो जण बेपत्ता   

नेपाळमधील जलप्रलय

काठमांडू : नेपाळमधील महापुरातील बळींची संख्या ३६२ वर पोहोचली असून, किमान ९१० जण बेपत्ता आहेत. यात ५९० पर्यटकांचा समावेश आहे.  तिबेटमध्येही ५५८ जण बेपत्ता  आहेत. नेपाळ आणि तिबेटमधील बेपत्ता नागरिकांची संख्या १,४६८ वर पोहोचली. बेपत्ता नागरिकांचा शोध घेण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पूरग्रस्त भागात युद्धपातळीवर बचाव आणि मदत कार्य सुरू आहे. लष्करासह विविध पथके बचाव कार्यात गुंतली आहेत. नेपाळमधील ही आतापर्यंत सर्वांत मोठी नैसर्गिक आपत्ती असून, जगभरातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.
 
तिबेटमधून उगम पावलेल्या भोटे कोसी आणि त्रिशुली नद्यांना बुधवारी अचानक आलेल्या महापुरामुळे मध्य नेपाळच्या रसुवा आणि धाडिंग जिल्ह्यांसह सीमावर्ती हाहाकार उडाला. परवा १७० जणांचे मृतदेह हाती लागले होते. काल आणखी १८९ मृतदेह सापडले. त्यामुळे बळींची संख्या ५९० वर पोहोचली, असे नेपाळ पोलिसांची प्रवक्ते अबी नारायण काफ्ले यांनी सांगितले.
 
सर्वाधिक १३२ मृतदेह चितवन जिल्ह्यातून सापडले. याव्यतिरिक्त नवलपरासी पूर्वमध्ये ६२, धाडिंगमध्ये २७, गोरखामध्ये २०, रसुवामध्ये १७, नवलपरासी पश्चिममध्ये १५, नुवाकोटमध्ये १२ आणि तनहुनमध्ये ९ जणांचे मृतदेह सापडले, असे ते म्हणाले.
 
बेपत्ता पर्यटकांमध्ये भारत, अमेरिका, मलेशिया, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्समधील पर्यटकांचा समावेश आहे.पूरग्रस्त भागात अडकलेल्या ८०० हून अधिक जणांची सुटका करण्यात आली आहे. बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. पूर ओसरला असला तरी सर्वत्र चिखलाचे आणि मलब्याचे साम्राज्य आहे. त्यामुळे बचाव आणि मदत कार्यात अडथळे येत आहेत. 
 
मात्र, स्थानिकांसह पथके मोठ्या हिमतीने बचाव कार्यात गुंतली आहेत, असेही ते म्हणाले. रासुवागढीजवळील नेपाळ-तिबेट सीमेपासून २० किलोमीटर ईशान्येला हिमनदीच्या भागासह मोठी दरड नदीच्या पात्रामध्ये कोसळली. त्यामुळे ल्हेंदे नदीच्या पात्रातील पाणी आणि मलबा भोटे कोसी खोर्‍यातील त्रिशूली नदीत येऊन नेपाळमध्ये महाप्रलयासारखी स्थिती उद्भवली. पाण्याच्या प्रचंड लोंढ्यामुळे उत्तर-दक्षिण वाहणार्‍या त्रिशूली नदीच्या काठावरील अनेक गावे, जलविद्युत प्रकल्प, रस्ते, पूल उद्ध्वस्त झाले, असे अधिकार्‍यांनी सांगितले. 

२८८ भारतीय अद्यापही बेपत्ता

नवी दिल्ली : नेपाळमधील विनाशकारी महापुरात २८८ भारतीय बेपत्ता झाले आहेत. त्यांच्याशी अद्याप कोणताही संपर्क होऊ शकलेला नाही, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने गुरूवारी दिली.
 
तिबेटमधून आलेल्या महापुराचा मध्य नेपाळला बुधवारी जोरदार तडाखा बसला. या घटनेस ३६ तासांहून अधिक काळ लोटला आहे. महापुरात अनेक शहरे आणि गावे उद्ध्वस्त झाली आहेत. या दुर्घटनेत अनेक जण बेपत्ता आहेत. यात २८८ भारतीयांचा समावेश आहे. नेपाळमधील जलविद्युत प्रकल्पांवर काम करणारे आणि तिबेटमधील कैलास मानसरोवर यात्रेसाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांचा यात समावेश आहे. तमिळनाडूतील २१ भारतीयांची सुटका करण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी सांगितले.
 
तिबेटमधील सुमारे २०० भारतीयांनी मदतीची मागणी केली आहे, असेही ते म्हणाले.महापुरामुळे मोठ्या भीषण परिस्थितीचा नेपाळला सामना करावा लागत आहे. या परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत नेपाळला सर्वतोपरी मदत करत राहील, असेही ते म्हणाले.
 
सुमारे २८८ भारतीय नागरिक अजूनही बेपत्ता आहेत. यामध्ये ’त्रिशुली वन पॉवर प्रोजेक्ट’वर काम करणार्‍या ७३ भारतीयांचा समावेश आहे. बेपत्ता कामगारांची माहिती मिळवण्यासाठी दूतावास प्रकल्पाच्या प्रमुखांच्या संपर्कात आहे, असे जयस्वाल म्हणाले. 

Related Articles