अमेरिका पाच लष्करी तळांवर उभारणार लघु अणुभट्ट्या   

वॉशिंग्टन : व्यावसायिक वीज वितरणावरील अवलंबित्व कमी करून लष्करी तळांना सुरक्षित आणि अखंड वीजपुरवठा उपलब्ध करून देण्यासाठी अमेरिकेने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. न्यूयॉर्कपासून टेक्सासपर्यंतच्या पाच लष्करी तळांवर अणुऊर्जेवर चालणार्‍या लघु अणुभट्ट्या उभारण्यात येणार आहेत. पुढील पाच वर्षांत या प्रकल्पासाठी २.२ अब्ज डॉलरपर्यंत खर्च केला जाणार आहे.
 
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रशासनाकडून नव्या पिढीतील अणुऊर्जा तंत्रज्ञानाला प्रोत्साहन दिले जात असतानाच लष्कराने हा प्रकल्प हाती घेतला आहे. वाढती विजेची मागणी, विशेषतः डेटा केंद्रांमुळे निर्माण होणारी गरज, पूर्ण करण्यासाठी मोठ्या अणुऊर्जा प्रकल्पांसह लघु आणि प्रगत अणुभट्टी तंत्रज्ञानाच्या विकासावरही अमेरिकेत भर दिला जात आहे.
 
पारंपरिक अणुऊर्जा प्रकल्पांच्या तुलनेत लघु अणुभट्ट्या आकाराने लहान असतात. त्यामध्ये वारंवार इंधन भरण्याची आवश्यकता नसून, त्या अनेक वर्षे कार्यरत राहू शकतात. त्यामुळे लष्करी तळांसाठी दीर्घकाळ उपलब्ध राहणारा स्वतंत्र ऊर्जा स्रोत म्हणून त्यांचा विचार केला जात आहे.बाह्य वीज वितरणामध्ये बिघाड झाल्यास, तसेच युद्ध, नैसर्गिक आपत्ती किंवा सायबर हल्ल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास, तळांवरील अत्यावश्यक यंत्रणा आणि पायाभूत सुविधांना या अणुभट्ट्यांद्वारे वीजपुरवठा सुरू ठेवता येणार आहे.
 
अमेरिकेचे लष्करी सचिव डॅन ड्रिस्कॉल यांच्या मते, या प्रकल्पामुळे लष्करी तळांना सुरक्षित आणि विश्वासार्ह पद्धतीने सातत्यपूर्ण वीजपुरवठा करण्याची क्षमता वाढेल. जगभरातील लष्करी मोहिमांसाठी आवश्यक ऊर्जा सुरक्षा मजबूत करणे आणि संभाव्यतः असुरक्षित बाह्य वीज ग्रीडवरील अवलंबित्व कमी करणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे.वीज वितरणा  केंद्रावर हल्ला झाल्यास किंवा मोठ्या तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास लष्करी तळांची कार्यक्षमता प्रभावित होऊ नये, यासाठी अमेरिका आता लघु अणुभट्ट्यांकडे पर्यायी आणि दीर्घकालीन ऊर्जा स्रोत म्हणून पाहत आहे.

पाच कंपन्यांची निवड

या प्रकल्पासाठी अमेरिकन लष्कराने पाच कंपन्यांची निवड केली आहे. लघु अणुभट्ट्यांची मालकी, उभारणी आणि संचालनासाठी पाच वर्षांच्या कालावधीत या कंपन्यांना एकूण २.२ अब्ज डॉलरपर्यंत निधी दिला जाणार आहे. मात्र, निधीचे वितरण निर्धारित कामगिरीचे टप्पे पूर्ण करण्याशी जोडलेले असेल. या उपक्रमांतर्गत २० पेक्षा अधिक लघु अणुभट्ट्या उभारून कार्यान्वित करण्याचे लष्कराचे उद्दिष्ट आहे.
 

Related Articles