समाजसेवेचा यज्ञ मांडलेल्या नहार यांच्या कार्याला सलाम   

सुशीलकुमार शिंदे यांचे गौरवोद्गार

पुणे : देशाच्या ज्या भागात समस्या आहेत, दुःख आहेत, तिथे सर्वांआधी पोहोचून, स्वतःच्या नावाने नव्हे तर महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, असा संदेश ज्यांनी दिला आणि समाजसेवेचा यज्ञ सातत्याने सुरू ठेवला, त्या संजय नहार यांच्या कार्याला मी सलाम करतो, असे गौरवोद्गार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी गुरुवारी येथे काढले.सरहद संस्थेचे संस्थापक संजय नहार यांची एकसष्ठी, त्यानिमित्त ’सरहदचा सांगाती’ या गौरवग्रंथाचे प्रकाशन आणि सरहद संस्थेची त्रिदशकपूर्ती, असा त्रिविध योग साधून आयोजिण्यात आलेल्या विशेष समारंभात शिंदे बोलत होते. 
 
यावेळी केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी ऑनलाईन स्वरूपात उपस्थित होते. उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, ललित गांधी, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, पुणे पुस्तक न्यासाचे मुख्य समन्वयक राजेश पांडे, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष गिरीश गांधी, माजी खासदार रणजीतसिंह मोहिते-पाटील, संपादक राजीव खांडेकर, मणिपूरचे खासदार प्रमोद बोडो, लडाखचे खासदार मोहंमद हनीफा जान, जम्मू काश्मीरचे ज्येष्ठ उद्योजक मुश्ताक छाया, श्रीनगरचे संपादक फैयाज कल्लू, सुषमा नहा,  गौरव समितीचे अध्यक्ष डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर, संतसिंह मोखा, युवराज शहा, इंज्र छाजेड आदी उपस्थित होते. हा कार्यक्रम गणेश कला क्रीडा मंच येथे झाला.
 
शिंदे म्हणाले, नहार धगधगत्या पंजाबात गेले. वाड्यावस्त्यांवर फिरले. तिथल्या दुःखी, अनाथ जिवांना भेटले. त्यांना दिलासा दिला. रस्त्यावर उतरून थेट साह्य केले. कठीण परिस्थितीत महाराष्ट्र तुमच्यासोबत आहे, असा संदेश दिला. गडकरी म्हणाले, राष्ट्रीय एकता, अखंडता अबाधित ठेवण्यासाठी लोकप्रबोधनाचे संजय नहार यांचे कार्य अभिमानास्पद आहे. पेटत्या पंजाबमध्ये त्यांनी सामाजिक दायित्वाच्या भावनेतून 21 शांततायात्रा केल्या. सर्व भेदांपलीकडे जात, माणुसकीचे नाते जपले आहे आणि अनेक भागांत गुणात्मक परिवर्तन घडवून आणले आहे.
 
चंद्रकांत पाटील यांनी विद्यार्थी चळवळीच्या काळातील काही आठवणींना उजाळा दिला. देशात जिथे समस्या तिथे संजय नहार, असे दृष्य असते. एकात्मतेची भावना वर्धिष्णु कशी होईल, यासाठी सातत्याने प्रयत्नशील, कृतीशील असे व्यक्तिमत्व म्हणजे संजय आहे. विद्यार्थ्यांच्या मनातील चुकीचे, अयोग्य विचार काढून योग्य, देशप्रेमाचे विचार रुजवण्याचे काम त्यांनी केले आहे. माधुरी मिसाळ, राजेश पांडे, डॉ. सदानंद मोरे,  संजय नहार,रणजीतसिंह मोहिते पाटील, राजीव खांडेकर, गिरीश गांधी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ. शैलेश पगारिया यांनी प्रास्ताविक केले. नीरजा आपटे आणि वैभव वाघ यांनी सूत्रसंचालन केले. लेशपाल जवळगे यांनी आभार मानले.

Related Articles