बगदादमध्ये गोळीबार; ब्रिगेडियर जनरल ठार   

बेकायदा बांधकामांवरील कारवाई दरम्यान हल्ला 

बगदाद : इराकची राजधानी बगदादमध्ये बेकायदा बांधकामे हटविण्यासाठी गेलेल्या लष्करी जवान आणि महापालिका कर्मचार्‍यांवर गुरुवारी गोळीबार करण्यात आला. या घटनेत लष्करातील ब्रिगेडियर जनरल ठार झाला असून, एका पोलिस अधिकार्‍यासह चार महापालिका कर्मचारी जखमी झाले आहेत.  बगदादच्या दक्षिणेकडील दोरा परिसरात बेकायदा बांधकामांविरोधात कारवाई सुरू असताना हा गोळीबार झाला. गोळीबारानंतर पोलिस आणि लष्करी दलांनी संपूर्ण परिसराची नाकेबंदी केली. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बगदाद ऑपरेशन्स कमांडर घटनास्थळी दाखल झाले. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी सुरक्षा यंत्रणांकडून परिसरात कारवाई सुरू करण्यात आली.बेकायदा बांधकामे हटविण्यासाठी कायदेशीर आदेश प्राप्त झाल्यानंतर बगदाद महापालिकेने ही कारवाई सुरू केली होती. बगदादच्या दक्षिण भागातील दोरा परिसरात मोठ्या प्रमाणावर कृषी क्षेत्र आहे. या भागात परवानगीशिवाय बांधकामे होण्याचे प्रमाण तुलनेने अधिक असल्याचे सांगण्यात येते. त्याच पार्श्वभूमीवर महापालिकेकडून बेकायदा बांधकामे हटविण्याची कारवाई करण्यात येत होती. याच कारवाईदरम्यान झालेल्या गोळीबाराने परिस्थिती चिघळली.

Related Articles