डीजेसाठी आग्रही मंडळांच्या मागणीपुढे पोलिसांची नरमाईची भूमिका   

चार बेस, चार टॉपला परवानगीची तयारी 

पुणे : गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सवातील डीजेंच्या वापराबाबत दोन बेस आणि दोन टॉपऐवजी चार बेस आणि चार टॉप वापरण्यास परवानगी देण्याची तयारी पोलिस प्रशासनाने दर्शविली आहे. सुमारे 80 टक्के गणेश मंडळांनी या पर्यायाला सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी दिली.
 
डीजेच्या वापरासाठी आग्रही असलेल्या गणेश मंडळांच्या मागणीवरून पोलिसांनी आपली भूमिका नरम केली आहे का, असा प्रश्न यामुळे उपस्थित झाला आहे. गणेशोत्सवात तसेच विसर्जन मिरवणुकीत यंदा डीजेचा आवाजाचा मुद्दा गाजत आहे. पोलिस प्रशासन यंदा डीजेचा कर्णकर्कश आवाज बंद करण्याच्या भूमिकेत आहेत. या संदर्भात पोलिस मंडळांशी बैठका घेत आहेत.सुरुवातीला मंडळांनी दोन टॉप व दोन बेस ध्वनियंत्रणा वापरावी, अशी भूमिका मांडली होती. मात्र, गणेश मंडळांच्या प्रतिनिधींनी चार टॉप आणि चार बेसचा पर्याय सुचविला. आता या पर्यायावर देखील पोलिस चर्चा करून तोडगा काढणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे आता नेमकी नियमावली काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
 
अतितीव्र आवाजाच्या उपकरणांना विरोध कायम 
 
नागरिकांना होणारा त्रास आणि ध्वनिप्रदूषण लक्षात घेऊन कर्णकर्कश आवाज करणार्‍या उपकरणांना मोकळीक दिली जाणार नाही, अशी भूमिका पोलिस प्रशासनाने कायम ठेवली आहे. मात्र गणेशोत्सव आणि दहीहंडी उत्सव निर्बंधमुक्त वातावरणात साजरा करण्याची मागणी गणेश मंडळे आणि कार्यकर्त्यांकडून होत आहे. उत्सवाचा उत्साह कायम ठेवतानाच ध्वनिप्रदूषणामुळे नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी सामान्य ध्वनियंत्रणेचा मर्यादित वापर आणि अतितीव्र आवाज करणार्‍या उपकरणांवरील नियंत्रण यामध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
प्लाझ्मा आणि प्रेशर मीडवर बंदीच
 
प्लाझ्मा आणि प्रेशर मीड यांसारख्या अतितीव्र आवाज निर्माण करणार्‍या उपकरणांच्या वापरावर बंदी कायम ठेवण्यात येणार आहे. या उपकरणांमुळे आवाजाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नसल्याचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. या भूमिकेला गणेश मंडळांच्या प्रतिनिधींकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला आहे.

Related Articles