बाजारात कांदा खातोय भाव   

मागणीच्या तुलनेत आवक कमी; खराब मालाचे प्रमाण वाढले

पुणे : बाजारात कांद्याला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. मात्र मागणीच्या तुलनेत आवक होत नसल्यामुळे महिनाभरात कांद्याच्या दरात किलोमागे 10 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे घाऊक आणि किरकोळ बाजारात कांदा भाव खातोय. विक्रीसाठी दाखल होत असलेल्या मालात खराब मालाचे प्रमाण अधिक असल्याची माहिती व्यापारी रितेश पोमण यांनी गुरूवारी दिली. 
 
मार्केटयार्डातील कांदा बाजारात रोज 90 ते 100 माल मोटारींची आवक होत आहे. त्यास दहा किलोला 350 ते 420 रूपये दर मिळत आहे. ही आवक अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, जिल्ह्यातील मंचर, खेड, शिरूर, आंबेगाव या भागातून होत आहे. कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडे साठवणूकीतील कांद्याचे प्रमाण कमी आहे. त्यातच खराब होणार्‍या कांद्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शेतकरी कांदा विक्रीसाठी पाठवत आहेत. चांगल्या कांद्याचे प्रमाणही कमीच असल्याचे पोमण यांनी नमूद केले. 
 
शहर आणि राज्यासह बांगलादेश, श्रीलंका या देशातूनही कांद्याला मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात दाखल होत असलेल्या कांद्याची विक्री होत आहे. हलक्या प्रतीच्या मालाला कमी, तर चांगल्या प्रतीच्या मालाला अधिक दर मिळत आहे. शेतकर्‍यांकडील साठवणूकीतील कांदा दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यात मागणी कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दरही आणखी काही काळ टिकून राहतील, असेही पोमण यांनी स्पष्ट केले. घाऊक बाजारातील दरात वाढ झाल्यामुळे किरकोळ बाजारातील कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात किलोचा दर 70 रूपयापर्यंत पोहचला आहे. त्यामुळे कांदा खरेदी करताना सर्वसामान्य ग्राहकांना विचार करावा लागत आहे. साठवणूकीतील कांदा संपत आल्यानंतर माथ कांद्याचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार असल्याचा अंदाजही व्यक्त केला जात आहे. 
 
नवीन कांद्याला यंदा उशीर 
 
यंदा पाऊस लांबल्यामुळे कांद्याच्या लागवडीला उशीर झाला आहे. त्यामुळे नवीन कांदा बाजारात दाखल होण्यास नेहमीच्या तुलनेत विलंब होईल. दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात नवीन कांदा बाजारात येतो. या कांद्याला उशीर झाल्यास आणि साठवणूकीतील कांदा संपत आल्यास दरात मोठी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे नवीन कांदा येईपर्यंत कांद्याला चांगले दर असणार आहेत. 
-रितेश पोमण, व्यापारी, मार्केटयार्ड. 

Related Articles