डिजेमुक्त गणेशोत्सवासाठी पुणेकर समाज माध्यमावर एकवटले   

पुणे : डिजेमुक्त गणेशोत्सवासाठी समाज माध्यमांवर पुणेकर एकवटले आहेत. ‘उत्सव साजरा करू या पण जबाबदारीने’ अशी भूमिका घेत नागरिक व्यक्त होत आहेत. जे आवाज सहनशक्तीच्या पलीकडे गेले आहेत. त्या विरोधात एकत्र येऊन आवाज उठवा, अशी स्पष्ट भूमिका डिजे विरोधात पुणेकरांनी घेतली आहे. ‘पुणेकर अतिरेकी आवाजाला वैतागलेला’ या मथळ्याखाली समाज माध्यमावर समुह तयार करण्यात आला आहे.
 
तसेच अतिआवाजाविरोधात उभे राहणार्‍या नागरिकांनी या समुहात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या समुहात सहभागी होण्याबरोबरच डिजे विषयीच्या भावना नागरिक व्यक्त करत आहेत. ‘आमचा उत्सवांना विरोध नाही, आम्ही सुद्धा संस्कृतीवादी आहोत! कर्णकर्कश वेगमर्यादेला आमचा विरोध अदल्याचे या समुहाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे. 
 
आवाजाच्या दणदणाटामुळे सर्वसामान्य नागरिक बहिरे होत आहेत. ध्वनीक्षेपकाच्या भिंतीमुळे ज्येष्ठ व लहान मुलांना त्रास सहन करावा लागतो. या सर्व गोष्टींना राजकीय पाठिंबा असेल, तर याचा अर्थ सामान्य नागरिकांच्या प्रकृतीची नेत्यांना काळजी नाही, त्यामुळे डिजेला पाठिंबा देणार्‍या राजकीय पक्षालाही याची जाणीव करून दिली पाहिजे. असा सूरही या समुहातील दिवसभराच्या चर्चेतून उमटला. डिजेला विरोध करणार्‍या या समुहाच्या सदस्य संख्येत मोठी वाढ झाली आहे. 
 
डिजेविरोधात रविवारी आंदोलन 
 
गणेशोत्सवात डिजेला विरोध करणार्‍यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. डिजे मुक्त उत्सव हा विचार समोर येत आहे. डिजेला विरोध करण्यासाठी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता नामदार गोखले चौकात पुणेकर एकवटणार आहेत. या आंदोलनात अधिकाधिक पुणेकरांनी सहभागी होण्याचे आवाहन ‘पुणेकर अतिरेकी आवाजाला वैतागलेला’ या समाज माध्यमावरील समुहाने केले आहे. 
 
आवाजाविरोधात मोर्चा 
 
पुण्याचा ऐतिहासिक गणेशोत्सव डिजे मुक्त व्हावा, केवळ पारंपरिक वाद्यानेच उत्सव साजरा करावा, यासाठी पुणेकरांनी एकत्र यावे, असे आवाहन सकल हिंदू समाजाने केले आहे. डिजे विरोधात येत्या रविवारी सकाळी 10.30 वाजता टिळक रस्त्यावरील अभिनव चौकापासून ते शनिवारवाडा मैदानापर्यंत पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. ‘आपला उत्सव प्रदूषणमुक्त करू या’ असा संदेश मोर्चात सहभागी होणारे नागरिक देणार आहेत. 

Related Articles