देशात साखरेची दरवाढ कृत्रिम   

हर्षवर्धन पाटील यांचा दावा

पुणे : देशात साखरेची निर्माण झालेली टंचाई कृत्रिम असून ग्राहकांसाठी आवश्यक असलेला सुमारे आठ महिन्यांचा साठा उपलब्ध आहे. गेल्या आठ-दहा दिवसांत साखरेच्या दरात किलोमागे 12 ते 17 रुपयांची वाढ झाली. मात्र, गेल्या तीन दिवसांपासून बाजारभावात घसरण झाली असून आजच्या बाजारभावात किलोमागे 17 रुपयांची घट झाली आहे. त्यामुळे झालेली दरवाढ कृत्रिम असल्याचे स्पष्ट होते, असा दावा माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना गुरुवारी केला. 
 
या दरवाढीचा लाभ शेतकर्‍यांना किंवा साखर कारखान्यांना झालेला नाही, तर ग्राहकांना त्याचा फटका बसला आहे. त्यामुळे या दरवाढीत नेमका फायदा कोणाचा झाला, याचा शोध सरकारने घ्यावा, अशी मागणीही पाटील यांनी यावेळी केला.साखरेच्या साठ्याची मर्यादा, जीएसटी, प्राप्तिकर तसेच साखर व्यापाराचे परवाने यावर सरकारचे नियंत्रण आहे. साखर कारखान्यांकडून विक्री झाल्यानंतर ती ग्राहकांपर्यंत न पोहोचता नेमकी कुठे जाते, याची चौकशी करण्याची मागणी यापूर्वीही केली असल्याचे त्यांनी सांगितले.
 
देशात साखरेचा साठा उपलब्ध असतानाही दहा लाख मेट्रिक टन कच्ची साखर आयात करण्याचा निर्णय घेण्यात आला असून त्याच्या मालवाहतुकीला लवकरच सुरुवात होईल, असे पाटील यांनी सांगितले. साखरेचा नवीन साठा बाजारात आणण्यासाठी 15 ऑक्टोबरपासून साखर कारखाने सुरू करण्याची सूचना करण्यात आली आहे. गळीत हंगाम लवकर सुरू केल्यास भविष्यातील टंचाई टाळता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.लवकर गाळप सुरू केल्यामुळे साखरेच्या उतार्‍यात घट होण्याची शक्यता असल्याने त्यासाठी तीन टक्क्यापर्यंत अनुदान तसेच जीएसटीमध्ये सवलत देण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. साखर उद्योगाचा शेतकरी, ग्राहक आणि कारखानदार या तिन्ही घटकांचा विचार करून समतोल धोरण आखण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले. 
 
आता साखरेची जर उपलब्धता जरी कमी वाटायला लागली तर साहजिकच आम्हाला असे दिसतंय की इथेनॉलवरती काही निर्बंध येण्याची शक्यता आहे. आता सरकारने ह्यामध्ये लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे ते म्हणाले. सरकारनेच इथेनॉल वाढवण्यासाठी जीआर काढला, दोन लाख कोटी इंटरेस्ट सबसिडी स्कीम काढली, एक लाख पन्नास हजार कोटीची गुंतवणूक इथेनॉलमध्ये झाली. इथेनॉलमुळे देशाचे परकीय चलन दोन लाख कोटीचे सरकारला मदत झाली. दीड लाख कोटीपर्यंत रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यामध्ये जमा झाली. पेट्रोलमध्ये 20 टक्के इथेनॉल मिसळले जात असल्यास त्याचा आर्थिक लाभ ग्राहकांनाही मिळायला हवा, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
 
साखर उद्योगातील प्रमुख संघटनांची तातडीची बैठक घेऊन या प्रश्‍नावर तोडगा काढावा, अशी विनंती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे पत्राद्वारे केल्याचे पाटील यांनी सांगितले. पुढील गळीत हंगामाबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली. पावसाअभावी ऊस लागवडीवर परिणाम झाला असून पुढील वर्षी कच्च्या मालाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी संकटाची तयारी आतापासूनच करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Related Articles