जिल्ह्यात अतिवृष्टीने 166 किलोमीटर रस्त्यांचे नुकसान   

दुरुस्तीसाठी 68 कोटींचा प्रस्ताव

पुणे : अतिवृष्टी आणि पुरामुळे जिल्ह्यातील सात तालुक्यांमधील ग्रामीण व जिल्हा मार्गांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यामध्ये एकूण 166.11 किलोमीटर लांबीचे रस्ते तसेच 107 पूल आणि मोर्‍यांचे नुकसान झाले आहे.  या दुरुस्तीसाठी 68 कोटी 26 लाखांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हाधीकार्‍यांना पाठवण्यात आल्याची माहिती बांधकाम व आरोग्य समितीच्या सभापती दिपाली हुलावळे यांनी दिली.
 
भोर, मुळशी, वेल्हे, मावळ, खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील बाधित रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी 49 कोटी 16 लाख, तर पूल व मोर्‍यांच्या कामांसाठी 19 कोटी 10 लाख रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. खेड तालुक्यात 33.83 किलोमीटर रस्ते आणि 30 पूल-मोर्‍यांचे नुकसान झाले असून, दुरुस्तीसाठी सर्वाधिक 23 कोटीची मागणी करण्यात आली आहे. मुळशी तालुक्यात सर्वाधिक 65.80 किलोमीटर रस्ते आणि 22 पूल-मोर्‍या बाधित झाल्या असून, त्यासाठी 17 कोटी 65 लाख प्रस्तावित आहेत.
 
भोर तालुक्यात 19.66 किलोमीटर रस्ते आणि तीन पूल-मोर्‍यांच्या दुरुस्तीसाठी 10 कोटी 75 लाख, जुन्नरमध्ये 15.40 किलोमीटर रस्ते व 22 पूल-मोर्‍यांसाठी 6 कोटी 30 लाख, तर आंबेगावमध्ये 12.70 किलोमीटर रस्ते व आठ पूल-मोर्‍यांसाठी 4 कोटी 81 लाखांची मागणी करण्यात आली आहे. वेल्हे तालुक्यात 3.72 किलोमीटर रस्ते आणि 20 पूल-मोर्‍यांच्या दुरुस्तीसाठी 3 कोटी 25 लाख, तर मावळमध्ये 15 किलोमीटर रस्ते व दोन पूल-मोर्‍यांसाठी 2 कोटी 50 लाखांची आवश्यकता दर्शविण्यात आली आहे.अतिवृष्टीमुळे ग्रामीण भागातील वाहतूक आणि दळणवळणावर परिणाम झाला असून, क्षतिग्रस्त रस्ते व पुलांची तातडीने दुरुस्ती करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी झेडपी कडून करण्यात आली आहे.
 
जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी आणि त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, यासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत. या मागणीसंदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची वेळोवेळी भेट घेऊन निवेदने दिली आहेत. ग्रामीण भागातील नागरिक, शेतकरी, विद्यार्थी आणि वाहनचालकांची गैरसोय लक्षात घेऊन शासनाने रस्ते, पूल व मोर्‍यांच्या दुरुस्तीसाठी तातडीने निधी मंजूर करावा. 
- दिपाली हुलावळे, सभापती बांधकाम व आरोग्य समिती

Related Articles