भीमाशंकर दर्शनाच्या ऑनलाइन बुकिंगचा फज्जा; भाविक संभ्रमात   

मंचर, (वार्ताहर) : श्री क्षेत्र भीमाशंकर येथे भाविकांना ऑनलाइन बुकिंगद्वारे दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा गाजावाजा करण्यात आला होता.त्यानुसार ऑनलाइन बुकिंगसाठी संकेतस्थळ सुरू करण्यात आले; मात्र सध्या हे संकेतस्थळच बंद असल्याने दर्शन बुकिंग कुठे आणि कशी करायची, याबाबत भाविकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
 
श्रावण महिन्यासह विविध सण आणि सुट्ट्यांच्या काळात भीमाशंकर येथे मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. गर्दीचे नियोजन आणि भाविकांना सुलभ दर्शन मिळावे, यासाठी ऑनलाइन दर्शन बुकिंगची सुविधा सुरू करण्याची माहिती देण्यात आली होती. त्यामुळे भाविकांनी या सुविधेकडे मोठ्या अपेक्षेने पाहिले होते. मात्र, ऑनलाइन बुकिंगसाठी देण्यात आलेले संकेतस्थळ बंद असल्याने भाविकांना बुकिंग करता येत नाही. संकेतस्थळ बंद असतानाही त्याबाबत अधिकृतपणे स्पष्ट माहिती उपलब्ध नसल्याने बाहेरगावाहून येणार्‍या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. दर्शनासाठी आगाऊ नोंदणी करायची की थेट मंदिरात जाऊन दर्शन घ्यायचे, याबाबतही संभ्रम कायम आहे. देवस्थान प्रशासनाने ऑनलाइन बुकिंग व्यवस्था तातडीने सुरळीत करावी किंवा संकेतस्थळ बंद असल्यास पर्यायी व्यवस्था व अधिकृत माहिती भाविकांना उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.
 
ऑनलाइन दर्शन बुकिंग व्यवस्था भाविकांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे.परंतु श्रावण महिन्यात भाविकांची प्रचंड गर्दी असल्याने संकेतस्थळ बंद ठेवण्यात आले आहे.श्रावण महिन्यानंतर संकेतस्थळ सुरु करून भाविकांना सुलभ दर्शनाची सोय केली जाईल.
 
- सुरेश कौदरे, अध्यक्ष भीमाशंकर देवस्थान ट्रस्ट
 
दर्शनासाठी ऑनलाइन बुकिंग असल्याचे समजल्याने आम्ही आगाऊ नियोजन केले. मात्र संकेतस्थळ बंद असल्याने बुकिंग कुठे करायची, याची माहिती मिळत नाही. प्रशासनाने तातडीने पर्यायी व्यवस्था जाहीर करावी.
 
- प्रसाद कराळे, सरपंच अवसरी खुर्द
 

Related Articles