ओबीसी प्रमाणपत्रावरुन काँग्रेस-राष्ट्रवादी आमनेसामने   

मुंबई, (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ओबीसी प्रमाणपत्र बनवून घेतल्याचा दावा काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्याने महाविकास आघाडीतील काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वादाची ठिणगी पडली आहे. वडेट्टीवार यांच्या आरोपावर सुप्रिया सुळे यांनी तीव्र आक्षेप घेत पुरावे सादर करण्याचे आव्हान दिले. दरम्यान, वाद वाढल्यानंतर वडेट्टीवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या नावाचा उल्लेख अनवधानाने झाला असल्याचे सांगत खेद व्यक्त केला.
 
भाजपचे ज्येष्ठ नेते व मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी ओबीसी प्रमाणपत्र घेतले असल्याचे बोलले जात आहे, याबाबत पत्रकारांनी वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले, अनेक नेत्यांनी अशी प्रमाणपत्रे घेतली आहेत. जरांगे-पाटील यांना कदाचित याची माहिती नसेल. पण, जेवढे मोठे नेते आहेत, त्या सर्वांनी ओबीसीचे प्रमाणपत्र घेऊन ठेवले आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडेही ओबीसीचे प्रमाणपत्र आहे, असा दावा त्यांनी केला. वडेट्टीवार यांच्या दाव्याचे पडसाद राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये उमटले. यासंदर्भात सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त करत वडेट्टीवार यांनी केलेला दावा फेटाळून लावला. यासंदर्भात त्यांनी ‘एक्स’ समाज माध्यमावर ट्विट केले. आपल्यावरील आरोप धादांत खोटा आहे. आपल्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याची माहिती वडेट्टीवार यांना कोणी आणि कोणत्या आधारावर दिली, हे त्यांनी जाहीर करावे, अशी मागणी सुप्रिया यांनी केली. तसेच, आपल्याकडे ओबीसी प्रमाणपत्र असल्याचा दावा खरा असेल, तर त्यासंदर्भातील पुरावे सार्वजनिक करावेत. 
 
अन्यथा, कोणत्याही पुराव्याशिवाय केलेल्या आरोपाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागावी, असे थेट आव्हान सुळे यांनी वडेट्टीवारांना दिले. या वादात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही उडी घेतली. अशा प्रकारची वक्तव्ये करणार्‍या नेत्यांना काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्वाने समज द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.

वादानंतर वडेट्टीवार यांची दिलगिरी

वाद वाढल्यानंतर विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडियावरील पोस्टद्वारे स्पष्टीकरण दिले. ओबीसी प्रमाणपत्राच्या संदर्भात आपली भूमिका मांडताना खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर कोणताही आरोप करण्याचा हेतु नव्हता, असे सांगत त्यांच्या नावाचा अनवधानाने उल्लेख झाला असल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. मात्र, ओबीसी प्रमाणपत्र घेणार्‍या मराठा नेत्यांबाबत आपली भूमिका कायम आहे. ओबीसी प्रमाणपत्र घेऊन सत्तेचा लाभ घ्यायचा आणि दुसरीकडे ओबीसी समाजाच्या हक्कांवर आघात करायचा, या भूमिकेचे आपण समर्थन करणार नाही. आपला संघर्ष कोणत्याही व्यक्तीविरोधात नसून ओबीसी समाजाच्या हक्कांचे संरक्षण आणि सामाजिक न्यायासाठी असल्याचेही वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

Related Articles