सुनील गाढवे यांच्यासोबत रोहित पवार यांचे संबंध   

भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांचा आरोप

एमपीएससी पेपरफुटी प्रकरण 

मुंबई, (प्रतिनिधी) : एमपीएससीच्या औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणातील सुनील गाढवे हे रोहित पवार यांचा उजवा हात असल्याचा आरोप भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला आहे. तसेच, त्या दोघांची एकत्रित छायाचित्रेही त्यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत सादर केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याही सोबतच्या छायाचित्रांचा यात समावेश आहे. आता सुनील गाढवे यांच्याशी आपला नेमका काय संबंध आहे, ते रोहित पवार यांनी स्पष्ट करावे, अशी मागणी बन यांनी केली.
 
या पेपरफुटी प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत जवळपास सहा आरोपींना अटक केली असून त्यांची चौकशी सुरू आहे. ज्या सुनील गाढवे यांच्यावरून भाजप, अभिमन्यू पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्याच्या महापौरांवर रोहित पवार, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्याकडून सातत्याने आरोप केले जात आहेत ते सुनील गाढवे कोण आहे, याची सविस्तर माहिती घेतली असता ते रोहित पवार यांच्या अत्यंत जवळचे असून, पुण्यातील एमपीएससीचे आंदोलन तसेच वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये दोघे एकमेकांसोबत काम करत असल्याचे उघडकीस आल्याची माहिती बन यांनी दिली.

पुण्यातील सर्व कामे तेच बघतात

रोहित पवार यांचे पुण्यातील सगळी कामे सुनील गाढवे पाहतात. फक्त रोहित पवारच नाही तर शरद पवार यांच्यासोबतही वेगवेगळ्या ठिकाणी पत्रकार परिषदांमध्ये सुनील गाढवे उपस्थित असल्याचे छायाचित्रांमध्ये पहावयास मिळत असल्याचे सांगून राष्ट्रवादी काँग्रेस आणि स्वतः रोहित पवार या प्रकरणात नेमकी काय भूमिका घेणार आहेत, असा सवाल बन यांनी उपस्थित केला.

Related Articles