मिझोराममधील महिलेकडून साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त   

पुणे रेल्वे स्थानकावर कारवाई  

पुणे : दिल्लीतील पुण्यात आलेल्या मिझोराममधील महिलेकडून तीन कोटी 41 लाखांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. पुणे रेल्वे स्थानकात केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेकडून ही कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर अमली पदार्थ तस्करीचे आंतरराज्यीय जाळे उघडकीस येण्याची शक्यता डीआरआयमधील अधिकार्‍यांनी व्यक्त केली.  लालरे मलियानी (वय-32, रा. ऐझॉल, मिझोराम) असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. दिल्लीतील हजरत निजामुद्दीन स्थानकातून निघालेल्या स्वर्णजयंती एक्सप्रेसमधून मलियानी प्रवास करत होती. तिच्याकडे अमली पदार्थांचा साठा असल्याची माहिती डीआरआयमधील अधिकार्‍यांना मिळाली. 
 
त्यानुसार, मंगळवारी पहाटे पुणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीन परिसरात सापळा लावण्यात आला. महिला अधिकार्‍यांच्या उपस्थितीत मलियानी हिच्याकडील पिशवी, तसेच साहित्याची तपासणी करण्यात आली. त्यावेळी तिच्याकडील पिशवीत दोन हजार 532 ग्रॅम स्फटिकासारख्या दिसणार्‍या गोळ्या, तसेच विविध रंगाच्या गोळ्या देखील सापडल्या. अमली पदार्थ तपासणी उपकरणाकडून (नार्कोटिक्स डिटेक्टशन किट) तपासणी करण्यात आली. तपासणीत मलियानीने अमली पदार्थ बाळगल्याचे उघडकीस आले. तिच्याकडून म्फेटामाइन, क्रिस्टल मेथ, एमडीएमए अशा अमली पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थांची किंमत तीन कोटी 41 लाख रुपये असल्याची माहिती डीआरआयमधील वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिली. 
 
आफ्रिकन व्यक्तीकडून मिळाले अमली पदार्थ 
 
अशिमा नावाच्या एका आफ्रिकन व्यक्तीने हे अमली पदार्थ दिले होते. रेल्वे तिकिटाची व्यवस्था त्याने केली होती. म्हैसूरला पोहचल्यानंतर अमली पदार्थांची पिशवी एका व्यक्तीला देण्याची सूचना अशिमाने महिलेला दिली होती, असे चौकशीतून स्पष्ट झाले आहे. आरोपी महिलेला विशेष न्यायालयाने डीआरआयच्या कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles