श्रावणात मटणाचा हट्ट करणार्‍या मुलाची वडिलांकडून हत्या   

पुणे : श्रावण महिन्यात दारू पिऊन घरी आल्यानंतर मटणाच्या जेवणाची मागणी केल्यावरून झालेल्या वादात वडिलांनी मुलाला बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वारजे माळवाडीच्या रामनगर परिसरात घडली. या मारहाणीत मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला असून पोलिसांनी आई-वडिलांना अटक केली. 
   
महेश भागवत गायकवाड (वय-30, रा. रामनगर, वारजे माळवाडी) असे मारहाणीत मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. तर, वडील भागवत सूर्यभान गायकवाड (वय-64) आणि आई पार्वती भागवत गायकवाड (वय-60) असे अटक करण्यात आलेल्या आई-वडिलांचे नाव आहे. याबाबत भागवत यांचा दुसरा मुलगा गणेश भागवत गायकवाड (वय-34, रा. रामनगर, वारजे माळवाडी) याने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 
 
24 ऑगस्ट रोजी रात्री साडेदहा ते पहाटे चार वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. फिर्यादी हे वारजे परिसरात पेंटिंगचे काम करतात. त्यांचे आई-वडील आणि लहान भाऊ महेश शेजारीच राहत होते. महेशचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. मात्र, तो कोणतेही कामधंदे करत नसल्याने आणि दारूच्या व्यसनामुळे त्याची पत्नी त्याला सोडून दोन मुलांसह माहेरी राहायला गेली होती. काही दिवसांपूर्वी दोघांचा घटस्फोटही झाला होता.
 
पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर महेश एकटाच राहत होता. जेवणासाठी तो आई-वडिलांकडे जात असायचा. कामधंदा नसणे आणि सतत दारू पिऊन घरी येणे यामुळे त्याचे वडिलांसोबत वारंवार वाद होत होते. दारू प्यायल्यानंतर तो अनेकदा मांसाहारी जेवणाची मागणी करत असे. मात्र, सध्या श्रावण महिना सुरू असल्याने घरात मांसाहार केला जात नव्हता. त्यामुळे यापूर्वीही दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते.
 
मटणावरून वाद
 
24 ऑगस्टच्या रात्री महेश नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी आला. त्याने जेवणासाठी मटणाच्या मागणीचा हट्ट धरला. श्रावणामुळे घरात मांसाहार केला जात नसल्याचे त्याला सांगण्यात आले. मात्र, महेशने मागणी कायम ठेवली. त्यावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाले. यावेळी भागवत गायकवाड यांनी महेशच्या तोंडावर आणि डोक्यावर जोरदार मारहाण केली. यात गंभीर जखमी झालेल्या महेशचा मृत्यू झाला. 
 
आईकडून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न 
 
मुलाचा मारहाणीमुळे मृत्यू झाल्याची माहिती असतानाही आई पार्वती यांनी ही घटना इतरांच्या निदर्शनास आणून दिली नाही. तसेच, पतीला वाचवण्यासाठी घटनास्थळावरील पुरावे नष्ट केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. महेशच्या भावाने दिलेल्या फिर्यादीवरून वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Related Articles