जपून ठेव बकुळीच्या फुलांपरी   

थकलेली माणसं , विजय तरवडे

आपल्या मागची पिढी साठी ओलांडल्यानंतर नातवंडांमध्ये रमत असे. आजी मंडळी देवदर्शन, भजन, कीर्तन, विविध देवस्थानांना भेटी देत. त्यांना बालपणीच्या मित्रमंडळींची आठवण येत असेलही; पण आपल्या आजीआजोबांचे बालमित्र, बालमैत्रिणी एकत्र जमल्याचे, सहलींना गेल्याचे आठवत नाही. आजोबा मंडळी निवृत्त झाल्यावर कचेरीतल्या सहकार्‍यांशी थोडेफार संबंध ठेवीत; पण माझ्या किंवा मित्रांच्या आजीचा माहेरच्या चार-सहा मैत्रिणींशी नियमित पत्रव्यवहार असल्याचे कधी दिसले नाही. तस्मात तेव्हा आजीच्या किंवा आजोबांच्या वर्तुळाला वर्तमानाचा मोठा परीघ होता.   
 
त्या काळात जवळपास सर्व शाळा वर्षअखेरीस स्नेहसंमेलन, अल्पोपाहार आयोजित करीत. त्यावेळी शाळेतर्फे एक वार्षिक अंक प्रकाशित होई. त्यात गुणवत्ताधारक मुलांचे फोटो. शिक्षकांचे लेख, विदयार्थ्यांचे हौशी लेखन प्रसिद्ध होई. हे अंक शाळांनी जपून ठेवलेत की नाही, ठाऊक नाही. पण जपले असतील तर त्यांचे डिजीटलीकरण करायला हवे. तो आठवणींचा मोठा ठेवा आहे. शाळा सोडल्यावर अनेक वर्षांनी काही विद्यार्थ्यांना पुन्हा एकत्र यावेसे वाटले तर शाळेतली जुनी रजिस्टर्स किंवा अंक सापडले तर त्यातली माहिती घेऊन एकमेकांचे पत्ते शोधायला मदत होत असे. पण अशी संमेलने दुर्मीळ होती. त्यांना वर्तमानपत्रात मिळणारी प्रसिद्धी देखील तुटपुंजी होती.  
 
नव्या शतकात विज्ञानाने हे चित्र बदलून टाकले. संगणक आणि नंतर आंतरजाल आले. माफक दारात स्मार्ट फोन आले. ऑर्कुट मागे पडल्यावर समाजमाध्यमात फेसबुक आले. सुरुवातीला त्याचा मोठा बोलबाला होता. व्हॉट्सएपचा वापर कमीच होता. फेसबुकवर तरुणाई (म्हणजे जेन झी नव्हे, पंचविशी-तिशीतली मुले-मुली) मोठ्या प्रमाणात होती. काळाच्या ओघात तिथे नव्याने येणारे तरुण कमी होत गेले. जे होते त्यातले काही सोडून गेले. मागे राहिले ते ज्येष्ठ नागरिक. विविध शहरातील जुने फोटो, जुन्या आठवणी, इतिहासातील रंजक माहिती, जुन्या पिढीतल्या लेखक-कलाकारांबद्दल केलेले लेखन असे फेसबुकवर दिसू लागले. फेसबुक हा जणू आभासी वृध्दाश्रमच बनला. 
 
1965 ते 1975-80 च्या दरम्यान शालेय शिक्षण संपलेल्या आणि साठी-सत्तरी गाठलेल्या-ओलांडलेल्या फेसबुकीयांनी फेसबुकचे माध्यम वापरून जुन्या सवंगड्यांचे शोध चालू केले. इथे मित्र सहजी सापडत होते. पण (लग्नानंतर आडनावे बदलल्यामुळे) मैत्रिणी सहजी सापडत नव्हत्या. इथे एक मित्र सापडला की ते सूत हाताशी धरून लोक इतर वर्गमित्र शोधू लागले आणि सगळीकडे शाळेतील मित्रांची ‘रियुनियन्स’ सुरू झाली. दैनिकांनी त्यांच्या स्थानिक पुरवणीत त्यांना प्रसिद्धी द्यायला सुरुवात केली. ठाऊक असलेले एक उदाहरण वानगीदाखल द्यायचे तर गेल्या चार-सहा वर्षात भारत इंग्लिश स्कूलमधल्या 1970, 1971 आणि 1972 मध्ये अकरावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी गुगल आणि फेसबुकचा वापर करून आपापल्या तुकडीतील सवंगडी शोधून काढून संमेलने उर्फ रियुनियन्स साजरी केली. 
 
इतकेच नव्हे तर त्या दशकात असलेल्या शिक्षकांचे देखील पत्ते शोधून काढले. सत्तरीतले विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि त्यांचे ऐशी-पंच्याऐंशी वर्षांचे शिक्षक हे चित्र अतिशय ह्रद्य होते. तब्बल पाच वर्षांनी शाळेच्या प्रांगणात वावरताना सगळ्यांची अंतःकरणे भरून आली असतील. शिक्षकांच्या हातात छड्या नव्हत्या. तरी विद्यार्थी त्यांच्याशी अदबीने बोलत होते. शिक्षकांमध्ये सर्वांना पुलंचे चितळे मास्तर दिसत असतील. दामले मास्तरांच्या आठवणी विद्यार्थी विसरून गेले असणार. हे एकाच शाळेत नव्हे, अनेक शाळात घडले असेल याची पूर्ण खात्री आहे. आता ही रियुनियन्स सर्रास होत असतात. ज्येष्ठ नागरिक नातवंडांच्या मदतीने अँड्रॉइड फोन सफाईदारपणे वापरतात. सापडलेले बालमित्र-बालमैत्रिणी जपून ठेवतात. एकदा मित्र-मैत्रिणी सापडले की त्यांचे व्हॉट्सएप समूह बनतात. रोज सकाळ-संध्याकाळ निरुपद्रवी गप्पा झडतात. 
 
विज्ञानाने सगळे आयुष्य असे माफक खर्चात सुंदर बनवून दिलेले आहे. पण गेल्या दशकात या सुखाला एकच गालबोट लागले आहे ते राजकारणाचे. पन्नास-साठ वर्षांपूर्वी शाळेत शिकणारी मुले-मुली निर्व्याज मैत्री करीत. जाती-धर्मावरून अंतर होते. पण कडवे शत्रुत्व नव्हते. मैत्रीला तेव्हा राजकारण नावाचा कॅन्सर झाला नव्हता. गेल्या दहा वर्षात या रोगाने उग्र रूप घेतले आहे. अनेक व्हॉट्सएप वर्तुळात पन्नास-साठ वर्षांपूर्वीची निरागस मैत्री देखील राजकीय मतभेदांमुळे तुटताना दिसते आणि वाईट वाटते. ज्येष्ठ नागरिकांना विज्ञानाने जे दिले ते राजकारणाने हिरावून घेतले. पंडित नेहरू वेगळ्या संदर्भात, पण गमतीने, स्वतःबद्दल बोललेले आठवते - राजकारण ने हमको निकम्मा कर दिया, वरना हम भी आदमी थे काम के.

Related Articles