पावसाने दडी मारल्याने पाथर्डीत खरीप धोक्यात   

पाथर्डी (वार्ताहर) : तालुक्यात पावसाने मोठी दडी मारल्याने खरीप हंगामातील बाजरी, कापूस, तूर, सोयाबीन, उडीद आदी पिके करपण्यास सुरुवात झाली आहे. पिकांची वाढ खुंटल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, शासनाने तातडीने नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.
 
भिलवडे येथील शेतकरी सुरेश बडे यांनी पिकांची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामे करण्याची मागणी केली. खरवंडी कासार परिसरातही पावसाअभावी खरीप पिकांची स्थिती चिंताजनक आहे. पावसाने आणखी ओढ दिल्यास उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही गंभीर होत असून, गरज असलेल्या गावांत टँकर सुरू करावेत, अशी मागणी होत आहे.पावसाअभावी हिरवा चारा उपलब्ध होत नसल्याने पशुधनाच्या संगोपनाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे शासनाने चारा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी संजय कीर्तने यांनी केली. शेतकर्‍यांनी बँका, पतसंस्था व खासगी सावकारांकडून कर्ज घेऊन पेरणी केली आहे. त्यामुळे कर्जफेडीचे संकट अधिक तीव्र झाले आहे.
 
प्रशासनाने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामे तातडीने पूर्ण करावेत. तसेच शेतकर्‍यांना आर्थिक मदत, पशुधनासाठी चारा आणि नागरिकांसाठी पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
 

Related Articles