ऊसावर पायरीला किडीचा धोका वाढला   

उत्पन्नात घट होण्याची शक्यता

टेंभुर्णी, (प्रतिनिधी) : माढा तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यातील ऊस पट्ट्यात पायरीला अर्थात पाकोळी या रसशोषक किडीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पावसाचा खंड, ढगाळ वातावरण आणि वाढलेली आर्द्रता यामुळे किडीस पोषक वातावरण तयार झाले असून, शेतकर्‍यांनी उसाची नियमित पाहणी करून सुरुवातीच्या अवस्थेतच नियंत्रणाच्या उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी तज्ज्ञांनी केले आहे.
 
पायरीला किडीची प्रौढ व पिल्ले उसाच्या पानांच्या खालच्या बाजूस राहून रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळसर पडणे, उसाची वाढ खुंटणे तसेच किडीच्या चिकट स्रावामुळे पानांवर काळसर बुरशी जमा होणे अशी लक्षणे दिसून येतात. काळसर थरामुळे प्रकाशसंश्लेषणाची प्रक्रिया मंदावल्याने पिकाच्या वाढीवर, उत्पादनावर आणि पुढील साखर उतार्‍यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असते.
 
शेतकर्‍यांनी आठवड्यातून किमान एकदा उसाच्या पानांची, विशेषतः पानांच्या खालच्या बाजूची तपासणी करावी. पायरीला, तिची पिल्ले किंवा अंडी आढळल्यास सुरुवातीच्या अवस्थेतच बाधित भागावर उपाययोजना करावी. प्रादुर्भावग्रस्त पाने काढून नष्ट करणे, शेतातील नैसर्गिक मित्रकिटकांचे संरक्षण करणे आणि शक्य असल्यास जैविक नियंत्रणासाठी एळिीळलरपळर ाशश्ररपेश्रर्शीलर या परोपजीवीचा वापर करणे उपयुक्त ठरू शकते.
 
माजी तालुका कृषी अधिकारी हनुमंत भोसले यांनी पायरीला नियंत्रणासाठी मोहीम पद्धतीने कीड व्यवस्थापनाचा सल्ला दिला. पायरीला किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची वाट पाहू नये. नियमित पाहणी करून सुरुवातीच्या अवस्थेत जैविक नियंत्रणाच्या उपायांना प्राधान्य द्यावे. प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असल्यास कृषी विभाग किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली पिकासाठी नोंदणीकृत व शिफारशीत कीटकनाशका सोबत बुरशीनाशकाचा वापर करावा. एकाच रसायनाची वारंवार फवारणी न करता शिफारशीनुसार कीटकनाशकांच्या गटांची फेरपालट करणे महत्त्वाचे आहे,  तसेच जैविक नियंत्रणामध्ये मेटारायझम नासॉफली ४० मिली प्रति दहा लिटर पाण्यासाठी फवारणी करावी, फवारणी करताना शिवार फवारणी करणे गरजेचे आहे. असे भोसले यांनी सांगितले.
 
पायरीला ही सुरुवातीला सहज दुर्लक्षित होणारी कीड आहे. मात्र प्रादुर्भाव वाढल्यानंतर नियंत्रणाचा खर्च आणि पिकाचे नुकसान दोन्ही वाढू शकते. त्यामुळे काळसर थर दिसण्याची वाट न पाहता पानांच्या खालच्या बाजूस किडीची सुरुवातीची चिन्हे तपासणे गरजेचे आहे. तसेच शेतात अनावश्यक पाणी साचणार नाही याची काळजी घेऊन पिकाची संतुलित वाढ राखावी.
 

Related Articles