दिनुशाच्या खेळीने श्रीलंकेने सामना वाचविला   

तळाच्या फलंदाजांनी पुन्हा झुंजवले; भारताचा 1-0 ने मालिका विजय 

कोलंबो : फॉलोऑन मिळाल्यानंतर श्रीलंकेने संयमी फलंदाजी करत भारताविरुद्धचा दुसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश मिळवले. भारतीय गोलंदाजांना श्रीलंकेच्या तळाच्या फलंदाजांनी पुन्हा झुंजवले. मात्र, दोन सामन्यांची मालिका भारताने 1-0 अशी जिंकली. गॉल येथे झालेल्या पहिल्या कसोटीत भारताने श्रीलंकेचा 165 धावांनी पराभव केला होता. कोलंबोतील दुसर्‍या कसोटी सामन्यात श्रीलंकेचा मधल्या फळीतील फलंदाज सोनल दिनुशा हा संघाचा हिरो ठरला. त्याने दोन्ही डावांत शतके झळकावली. पहिल्या डावात 103 धावा करणार्‍या दिनुशाने दुसर्‍या डावात नाबाद 133 धावांची खेळी केली.
 
दिनुशाने दुसर्‍या डावातही संयमी आणि भक्कम फलंदाजी केली. पहिल्या डावातील 103 धावांनंतर त्याने दुसर्‍या डावात नाबाद 133 धावा केल्या. अवघ्या पाचवा कसोटी सामना खेळणार्‍या दिनुशाने मालिकेत एकूण 419 धावा केल्या असून त्याची सरासरी 139.66 इतकी राहिली. दुसर्‍या डावात दिनुशाला खालच्या फळीतील फलंदाजांनी भक्कम साथ दिली. मानव सुथारने नुवंथाला बाद करून ही भागीदारी तोडली, मात्र त्यानंतरही श्रीलंकेच्या फलंदाजांनी प्रतिकार कायम ठेवला. प्रभात जयसूर्याने 71 चेंडू खेळून दिनुशाला साथ दिली. त्यानंतर लाहिरू कुमारा तब्बल 90 चेंडूंत 12 धावा करत दोन तास खेळपट्टीवर टिकून राहिला. त्याने दिनुशासोबत 170 चेंडूंत 47 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. अखेर रविंद्र जडेजाने त्याला बाद केले, तोपर्यंत श्रीलंका सुरक्षित स्थितीत पोहोचली होती.
 
दिनुशाच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने सामन्याच्या अखेरच्या दिवशी दुसर्‍या डावात 9 बाद 429 धावा केल्या. दिनुशा 133 धावांवर नाबाद राहिला, तर सूर्याबंदराने 92 धावा केल्या. भारताकडून जडेजाने 3 बाद 94 आणि सुथारने 3 बाद 121 बळी घेतले. श्रीलंकेची आघाडी 216 धावांपर्यंत पोहोचली होती आणि सामन्यात केवळ 17 षटके बाकी होती. त्यानंतर दोन्ही संघांच्या संमतीने सामना अनिर्णित घोषित करण्यात आला.या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि 9 बाद 503 धावांवर डाव घोषित केला. प्रत्युत्तरात श्रीलंकेचा पहिला डाव 290 धावांत आटोपला. त्यामुळे भारताला 213 धावांची आघाडी मिळाली. त्यानंतर कर्णधार शुभमन गिलने श्रीलंकेला फॉलोऑन देण्याचा निर्णय घेतला. 
 
अखेरच्या दिवशी केवळ तीन बळी
 
चौथ्या दिवसअखेर श्रीलंकेने दुसर्‍या डावात 6 बाद 229 धावा केल्या होत्या. त्यावेळी श्रीलंकेकडे केवळ 16 धावांची आघाडी होती. मात्र, अखेरच्या दिवशी 81.2 षटकांच्या खेळात भारतीय गोलंदाजांना केवळ तीन बळी घेता आले. श्रीलंकेने या कालावधीत आणखी 200 धावांची भर घातली. केशारा नुवंथा आणि दिनुशा यांनी सातव्या विकेटसाठी 246 चेंडूंत 112 धावांची भागीदारी करत भारताच्या विजयाच्या आशा धूसर केल्या. 
 
संक्षिप्‍त धावफलक :
 
भारत पहिला डाव : 9 बाद 503 धावांवर घोषित -  पडिक्कल 117, जुरेल नाबाद 115, असिथा 4-106. 
श्रीलंका पहिला डाव : सर्वबाद 290 - दिनुशा 103, सूर्याबंदारा 80, प्रसिद्ध 3-52, सुथार 3-85.  फॉलोऑननंतर 9 बाद 429 धावांवर घोषित : दिनुशा नाबाद 133, सूर्याबंदारा 92, जडेजा 3-94, सुथार 3-121. सामना अनिर्णित.

Related Articles